महिला व बालकल्याण : ८७३ अंगणवाडीत अंधार तर २७८ ठिकाणी पिण्याचे पाणी नाही
By जितेंद्र दखने | Published: February 9, 2024 09:46 PM2024-02-09T21:46:35+5:302024-02-09T21:46:48+5:30
चिमुकल्याना पुरेसा सोयीसुविधांपासून दूर
अमरावती: जिल्ह्यातील २ हजार ५९२ अंगणवाडी केंद्रापैकी ८७३ ठिकाणी वीजपुरवठा नसल्याने अंधार पसरला आहे तर २७८ अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे वास्तव समाेर आले आहे. परिणामी अंगणवाडी केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने चिमुकले सोयीसुविधांपासून वंचित आहे.
महिला व बालकल्याण विभागांतर्गत ग्रामीण भागात २ हजार ५९२ अंगणवाडी केंद्र कार्यान्वित आहेत. यापैकी आजघडीला १ हजार ४६६ ठिकाणीच वीजजोडणी आहे. तर ८७३ केंद्रामध्ये अंधार असून यामध्ये ६८ केंद्र भाड्याचे ठिकाणी आहेत तर ८६ केंद्र शाळेत कार्यरत असून इतर ठिकाणी ९९ कार्यरत आहे. याशिवाय २३१४ आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा असली तरी अजूनही २७८ अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे.त्यामुळे अंगणवाडी शिकणाऱ्या चिमुकल्याची ताहन बाहेरून पाणी आणून भागवावी लागत आहे. एकीकडे अंगणवाडी केंद्रामध्ये डिजिटल शिक्षण देण्याचे प्रयत्न होत असता अनेक अंगणवाडी केंद्राच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. असे असताना मात्र, वीज आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
२७८ अंगणवाड्या नळजोडणीविना
जिल्ह्यातील २५९२ अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के नळजोडणी झालेली नाही.२७८ ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याने याचा अंगणवाडीत पोषण आहार शिजविण्यासह चिमुकल्याची तहान भागविण्यासाठी कसरत होत आहे. त्यात चांंदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक ५४ ठिकाणी नळजोडणी नाही तर धारणी तालुक्यातील २३३ अंगणवाडी केंद्रापैकी सर्वाधिक १६८ ठिकाणी विजेचा अभाव आहे.
आयुक्तालय स्तरावरून अंगणवाडी केंद्रात वीज जोडणीसाठी सौरऊर्जेवर आधारीत विजेची व्यवस्था केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ज्या ठिकाणी वीज नाही अशा अंगणवाडी केंद्रात प्राधान्याने वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल तर जेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अशा ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत उपायोजना केल्या जातील. डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण