सत्तरी पार मतदारांमध्ये महिलांची संख्या जास्त, १८ ते ६९ वयोगटात पुरुष अधिक
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 3, 2023 07:14 PM2023-10-03T19:14:48+5:302023-10-03T19:15:10+5:30
मतदार यादीचा पुननिरीक्षण कार्यक्रम जिल्हा निवडणूक विभागाद्वारा राबविण्यात येत आहे
गजानन मोहोड, अमरावती: अधिकाधिक मतदारांची नोंदणी व्हावी व याद्वारे मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी आयोग आग्रही आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहते. आज स्थितीत जिल्ह्यात १८ ते ६९ या वयोगटात पुरुष मतदार जास्त आहेत तर ज्येष्ठ अन् वयोवृद्धांच्या समजल्या जाणाऱ्या ७० ते १२० वयोगटात पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. मतदार यादीचा पुननिरीक्षण कार्यक्रम जिल्हा निवडणूक विभागाद्वारा राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदार यादी अपडेट करण्यात आलेली आहे.
यानुसार जिल्ह्यात २३,९२,६१७ मतदार आहेत. लोकशाही बळकट होण्यासाठी अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष मतदान करणे महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाद्वारा सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. सध्या बीएलओद्वारा गृहभेटी देण्यात येत आहे. यामध्ये मतदारांची पडताळणी करण्यात येत आहे. याशिवाय नवमतदारांची अधिकाधिक नोंदणी व्हावी याकरिता शिबिरे घेण्यात येत आहे. याशिवाय महाविद्यालयातही नोंदणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत नवमतदारांच्या १८ ते १९ या वयोगटात २०,८१९ तरुणाईने मतदार नोंदणी केली आहे.
ज्येष्ठ अन् वयोवृद्धांच्या गटात ६,२२७ महिला जास्त
जिल्ह्यात सर्वाधिक मतदार ३० ते ३९ वयोगटात ५,४०,५७९ तर ४० ते ४९ वयोगटात ५,०८,६५९ मतदार आहेत. १८ ते ६९ वयोगटात ११,२५,६२७ पुरुष व १०,५९,२३१ महिला मतदार आहे. याउलट ७० ते १२० प्लस वयोगटात १०,७७,६९ पुरुष व ११,३९,९६ महिला मतदार आहे. म्हणजेच ज्येष्ठ व वयोवृद्ध मतदारांमध्ये पुरुषांच्या तुलनेत ६,२२७ महिला जास्त आहे.