अमरावतीमधील इर्विन रुग्णालयात महिला दगावली, तिच्या निवासस्थानी तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:18 PM2020-05-18T21:18:35+5:302020-05-18T21:20:02+5:30
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर जिल्हा सामान्य (इर्विन) रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मृत्यू झाला. मृतदेहाची हालचाल झाल्याच्या गैरसमजातून बेलपुरा येथील तिच्या निवासस्थानी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर जिल्हा सामान्य (इर्विन) रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मृत्यू झाला. मृतदेहाची हालचाल झाल्याच्या गैरसमजातून बेलपुरा येथील तिच्या निवासस्थानी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
पूजा वाघमारे (२७, रा. बेलपुरा), असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे ३ मे रोजी सिझेरियन झाले. १० मे रोजी पुढील उपचाराकरिता त्यांना इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डफरीनच्या वैद्यकीय अधीक्षक विद्या वाठोडकर यांनी दिली. इर्विन रुग्णालयात सोमवारी सकाळी १० च्या सुमारास त्या दगावल्या. यानंतर महिलेचा मृतदेह बेलपुऱ्यात आणण्यात आला. यावेळी शरीराची हालचाल झाल्याच्या गैरसमजातून नातेवाइकांनी तिला तातडीने राजापेठ येथील एका खासगी इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी इर्विनला रेफर केले. इर्विन रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. यादरम्यान बेलपुऱ्यात लोकांची गर्दी झाली होती. कोरोनाच्या संचारबंदीतही २०० पेक्षा अधिक नागरिक गोळा झाल्याची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. यानंतर गर्दी पांगली. सायंकाळी सदर महिलेचा अंत्यसंस्कार करण्यात आला.