धारणीत अतिक्रमण निर्मूलन पथकाला महिलांनी हाकलले
By admin | Published: January 13, 2016 12:15 AM2016-01-13T00:15:42+5:302016-01-13T00:15:42+5:30
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या पथकाला महिलांनी परतवून लावले. त्यामुळे महिलाशक्तीसमोर पोलिसांसह प्रशासनही हतबल झाले.
४८ तासांचे अल्टिमेटम : पोलीसही झाले हतबल
धारणी : शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या पथकाला महिलांनी परतवून लावले. त्यामुळे महिलाशक्तीसमोर पोलिसांसह प्रशासनही हतबल झाले. मंगळवारी दुपारी २ वाजतादरम्यान शासकीय भूखंडावर जवळपास ९ अतिक्रमितांनी ताबा घेऊन कच्चे घरे बांधण्याचा समाचार घेण्यासाठी महसूल, पोलीस व नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी व पदाधिकारी गेले होते. मात्र त्यांना महिलांनी हाकलून लावले.
अतिक्रमण करून बसलेल्यांनी कर्मचाऱ्यांना हटकले. काहींनी पूर्वी करण्यात आलेली अतिक्रमणे प्रथम काढा नंतर आमच्याकडे या अशा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाली. पोलीस बंदोबस्तात एकमात्र महिला शिपायाचे महिला शक्तीसमोर काहीच चालले नाही. त्यामुळे आणखी वाढीव बंदोबस्तात दोन दिवसांनंतर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे पथकप्रमुख नायब तहसीलदार जी. ई. राजगडे यांनी जाहीर केले. तोपर्यंत आपापले अतिक्रमण स्वत:हून काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे ४८ तासाचे अल्टिमेटम मिळाल्याने तूर्तास अतिक्रमण धारकांना अभय मिळाले आहे.
शासकीय जमिनीवरील वाढत्या अतिक्रमणाबाबत आजच ‘लोकमत’ने सचित्र बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत नायब तहसीलदार राजगडे, मंडळ अधिकारी सीताराम कास्देकर, तलाठी रूपेश गिरी, नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा रेखा पटेल, नगर पंचायतीचे कर्मचारी अमीन शेख हे पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यासाठी प्रभाग क्रमांक २ मध्ये दाखल झाले होते.
यावेळी ९ अतिक्रमण करणाऱ्यांनीही महिलाशक्तीसमोर दंड थोपटून उभे होते. दरम्यान तक्रारकर्ते व अतिक्रमणधारकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. (तालुका प्रतिनिधी)