महाराष्ट्रातील महिला असुरक्षितच; उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:03 PM2018-03-19T16:03:15+5:302018-03-19T16:03:24+5:30

महिलांविषयक गुन्ह्यात झालेली वाढ राज्यातील महिलाशक्ती असुरक्षित असल्याचेच अधोरेखित करणारी आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये अशा गुन्ह्यांमध्ये ८२५ ने वाढ झाली आहे.

Women in Maharashtra are unsafe; Second place after Uttar Pradesh | महाराष्ट्रातील महिला असुरक्षितच; उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक

महाराष्ट्रातील महिला असुरक्षितच; उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक

Next
ठळक मुद्देगुन्ह्यांमध्ये वाढ

प्रदीप भाकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिलांविषयक गुन्ह्यात झालेली वाढ राज्यातील महिलाशक्ती असुरक्षित असल्याचेच अधोरेखित करणारी आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये अशा गुन्ह्यांमध्ये ८२५ ने वाढ झाली आहे. राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या २०१७-१८ च्या आर्थिक पाहणी अहवालाच्या निमित्ताने ही बाब उघड झाली आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात महिलाविषयक गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी कडक कायदे आहेत. दिल्लीच्या निर्भया हत्याकांडानंतर तर कायद्यात सुधारणा करून गुन्हेगारांना अधिकाधिक शिक्षा मिळवून देण्यासाठी शासनाने पाऊल उचलले. तरीही कोपर्डी बलात्कारासारखी अश्लाघ्य घटना उघडकीस आलीच. त्यानंतर महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये घट अपेक्षित असताना गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे.
बलात्कार, अपहरण, विनयभंग, लैंगिक अत्याचार, अनैतिक व्यापारासह हुंडाबळी, पती व नातेवाइकांकडून झालेली क्रूर कृत्ये याप्रकरणी २०१५ साली ३१ हजार १२६ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात २०१६ मध्ये वाढ होऊन ती संख्या ३१ हजार २७५ वर स्थिरावली, तर २०१७ मध्ये ३२ हजार १०० गुन्हे नोंदविण्यात आलेत. २०१७ मध्ये २३४ महिला हुंडाबळी ठरल्या. त्यामुळे २०१६ मध्ये २४८, तर २०१५ मध्ये २६८ महिला हुंडाबळी ठरल्याची नोंद आहे. २०१७ मध्ये बलात्काराची ४,३५६ प्रकरणे नोंदविण्यात आली. २०१६ मध्ये तो आकडा ६१६९ होता. २०१७ मध्ये १२ हजार २३४, २०१६ मध्ये ११ हजार ३९६, तर सन २०१५ मध्ये ११ हजार ७१३ विनयभंगाची प्रकरणे नोंदविण्यात आली. २०१५ आणि २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये लैंगिक अत्याचारप्रकरणी नोंदविलेल्या गुन्ह्यात (८६४) घट झाली. २८१ प्रकरणांमध्ये २०१७ साली अनैतिक व्यापाराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पती व नातेवाइकांकडून झालेली क्रूर कृत्ये २०१७ मध्ये ६२४२ राहिली, तर २०१६ मध्ये ७२१५ तर २०१५ मध्ये ७६४० प्रकरणे नोंदविण्यात आली.

नऊ राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसरा
उत्तर प्रदेशात दरवर्षी सर्वाधिक महिला अत्याचार नमूद होतात. उत्तर प्रदेशासह गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्यांतील नोंदविलेल्या गुन्ह्यांचा विचार करता, या राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. गुजरात आणि केरळ राज्यात महिलांविषयक गुन्ह्यांची नोंद १० हजारांच्या आत आहे. उत्तर प्रदेशात तो आकडा ५० हजारांवर गेला आहे.

Web Title: Women in Maharashtra are unsafe; Second place after Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला