दुचाकी, चाकू, केशरी दुपट्टा, चेनस्नॅचिंग अन् रफुचक्कर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 03:00 PM2021-11-24T15:00:24+5:302021-11-24T15:22:38+5:30
प्रिया टाऊनशिप भागात मॉर्निंग वाॅक करणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील मंगळसूत्र हिसकाविण्यात आले. तर, आशियाड कॉलनीतदेखील असाच प्रकार उघडकीस आला आहे.
अमरावती : शहरात सध्या दुचाकी, चाकू, केशरी दुपट्टा, चेनस्नॅचिंग अन् रफुचक्कर ! असे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे दोन्ही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. चेनस्नॅचिंगच्या दोन्ही घटना संचारबंदीच्या काळात घडल्या आहेत.
प्रिया टाऊनशिप भागात मॉर्निंग वाॅक करणाऱ्या महिलेला चाकू दाखवून तिच्याकडील मंगळसूत्र हिसकाविण्यात आले. आशियाड कॉलनीतदेखील ‘सेम’ प्रकार घडला होता. त्यामुळे या दोन्ही घटनांच्या अनुषंगाने गाडगेनगर व नांदगाव पेठ पोलिसांना हवे असलेले चेनस्नॅचर्स एकच असावेत का, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास एक महिला प्रिया टाऊनशिपमधील गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने मोकळ्या मैदानात मॉर्निंग वाॅक करीत होती. तेव्हा एका दुचाकीवर दोघे आले. दुचाकी थोड्या दूर अंतरावर ठेवली. त्यातील एक इसम महिलेच्या मागे आला व त्यांना थांबवून आवाज करायचा नाही, असा दम दिला. चाकूचा धाक दाखवून त्याने महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. तो त्याच्या सहकाऱ्यासह दुचाकीने पळून गेला. नांदगाव पेठ पोलिसांनी मंगळवारी ११च्या सुमारास दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
असे होते वर्णन
महिलेच्या तक्रारीनुसार, ज्या संशयिताने मंगळसूत्र हिसकले, त्याने चेहऱ्याला पिवळा दुपट्टा बांधलेला होता. जिन्स पॅन्ट व टोपी असलेले निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते. दुसऱ्या व्यक्तीनेदेखील टोपी असलेले निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते. दोघेही काळ्या रंगाच्या दुचाकीने गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने पळून गेले.
चेनस्नॅचर्सनी बदलविली पध्दत
आतापर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला असता, दुचाकीवर येऊन महिलेच्या मागून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकले जायचे अन् पळून जायचे, अशी पद्धत अंगीकारली गेली. तसे गुन्हेदेखील नोंदविण्यात आले. मात्र, अलीकडच्या दोन घटनांमध्ये चाकूच्या धाकावर दोन्ही महिलांना लुटण्यात आले. त्यामुळे हे चेनस्नॅचर्स वेगळे असावेत, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
आशियाड कॉलनीतील घटनेशी साधर्म्य
१७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ दरम्यान आशियाड कॉलनीतील गणपती मंदिराजवळ महिलेचे १४ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. दुचाकीने आलेल्या दोघांपैकी एकाने त्या ५२ वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून ओलीस ठेवले व ते झटापटीत हाती आलेले ७ ग्रॅमचे मंगळसूत्र घेऊन पोबारा झाले. त्यातही एका व्यक्तीने केशरी रंगाचा दुपट्टा बांधलेला होता. दोन्ही घटनांमध्ये दुचाकी, चाकू आणि दुपट्टा या गोष्टी एकमेकांशी साधर्म्य सांगाणाऱ्या आहेत.
वर्षभरातील १२ घटना
जानेवारी ते २३ नोव्हेंबर रोजीपर्यंत शहर आयुक्यालय क्षेत्रात मंगळसूत्र हिसकावून पळ काठण्याच्या १२ घटना नोंदविल्या. यामध्ये १३ मंगळसूत्र लंपास करण्यात आले.