दारू दुकान उघडण्याचा डाव महिलांनी उधळला
By admin | Published: May 9, 2017 12:15 AM2017-05-09T00:15:45+5:302017-05-09T00:15:45+5:30
राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील दारूविक्रीची दुकाने बंद करण्यात आल्यानंतर शिल्लक राहिलेल्या शहरातील २ दारूविक्री दुकानांवर मद्यपींची गर्दी वाढली आहे.
वरूडमध्ये महिला आक्रमक : दारू दुकानापुढे दिला ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील दारूविक्रीची दुकाने बंद करण्यात आल्यानंतर शिल्लक राहिलेल्या शहरातील २ दारूविक्री दुकानांवर मद्यपींची गर्दी वाढली आहे. त्यामुळे महिला, मुलींना त्रास वाढला होता. त्यामुळे १० दिवसांपूर्वी ही दोन्ही दारू दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन यशस्वी झाल्याने या दुकानांना सील लावण्यात आले होते. मात्र, सोमवारी या दोन्ही दुकानांचे सील तोडून ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. ही बाब लक्षात येताच रविवार दुपारपासून पुन्हा महिलांनी दारू दुकानासमोर ठिय्या देत दुकान उघडण्याचा डाव उधळला.
महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद झाल्याने शहरातील २ देशी दारूच्या दुकानांमध्ये ग्राहकांची तुंबळ गर्दी उसळत होती. येथे वादविवादही वाढले होते. यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे विशेषत: महिलांचे व मुलींचे जीवन असुरक्षित व धोकादायक झालेले होते. या दुकानांमुळे परिसरातील लोकांना त्रास असह्य झालेला होता. यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन दोन्ही देशी दारू दुकानांसमोर दारूमुक्ती जनसत्याग्रह आंदोलन केले होते. आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणून या दोन्ही दुकानांना सील ठोकण्यात आले होते. यापुढे ही दोन्ही दुकाने उघडली गेल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. परंतु दोन दिवसांपूर्वी या दोन्ही दुकानमालकांनी स्वत:च सील तोडले आणि पुन्हा दुकान सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु परिसरातील महिलांनी व युवकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. आ. अनिल बोंडे व वसुधा बोंडे यांनीदेखील घटनास्थळी पोहोचून आंदोलनाचे नेतृत्व केले.
आंदोलनात पंचायत समिती सदस्या अर्चना तुमराम, पालिका उपाध्यक्ष किशोर भगत, गटनेता व नगरसेवक नरेंद्र बेलसरे, हरीश कानुगो, मनोज गुल्हाने, राजू सुपले, योगेश चौधरी, देवेंद्र बोडखे, नगरसेविका नलिनी रक्षे, पुष्पा धकिते, रेर्खा काळे, मंदा आगरकर, शुभांगी खासबागे, छाया दुर्गे, सुवर्र्णा तुमराम, अर्चना आजनकर, भारती माळोदे, स्वीकृत सदस्य संतोष निमगरे, प्रितम अब्रुक, युवराज आंडे, भारत खासबागे, सुरेश दुर्गे, सागर मालपे, राजेंद्र काळे, प्रकाश माळोदे, संजय आगरकर, हारून शहा, प्रभाकर दौड, राहुल पाटील आदींचा सहभाग होता.