महिला पोलिसांनी बजावले ठाणेदाराचे कर्तव्य
By admin | Published: March 9, 2017 12:14 AM2017-03-09T00:14:23+5:302017-03-09T00:14:23+5:30
महिलादिनी महिलांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने बुधवारी शहरातील दहाही ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस निरीक्षकांचा पदभार सोपविण्यात आला होता.
सन्मान :भातकुली ठाण्यात स्टेशन डायरीचा कार्यभार
अमरावती : महिलादिनी महिलांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने बुधवारी शहरातील दहाही ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस निरीक्षकांचा पदभार सोपविण्यात आला होता. शिवाय भातकुली ठाण्यात महिला पोलीस नाईकला स्टेशन डायरीचे कामकाज सोपविले होते. हा आगळावेगळा उपक्रमाची अमंलबजावणी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने करण्यात आली.
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १० पोलीस ठाण्यांत विविध पदांवर महिला पोलीस कार्यरत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस पुरुषांप्रमाणे कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने बुधवारच्या महिला दिनी शहरातील सर्वच ठाण्याचा कार्यभार महिला पोलिसांकडे सोपविण्यात आला. ठाणेदारांची धुरा सांभाळताना महिला पोलीस उपनिरीक्षक योग्यरित्या कर्तव्य बजावू शकतात. त्यादृष्टीने महिला पोलिसांकडे एक दिवसासाठी ठाण्याचे कामकाज सोपविले. यात कोतवाली ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांनी सांभाळला. त्याचप्रमाणे बडनेरा ठाण्याचा प्राजक्ता धावडे, राजापेठचा मनीषा सामटकर, फे्रजरपुराचा ज्योती बडेगावे, वलगाव ठाण्याचा माधुरी उंबरकर, गाडगेनगर ठाण्याचा सुलभा राऊत, नागपुरी गेट ठाण्याचा भारती इंगोले, खोलापुरी गेट ठाण्याचा शुभांगी थोरात व वाहतूक शाखेचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक सुनिता काळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या सर्व महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठाण्याचे योग्यरित्या कामकाज सांभाळल्याचे दिसून आले आहे.
महिला पोलीस नाईक
भातकुली ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर महिला नसल्यामुळे तेथील महिला पोलीस नाईक सुवर्णा टेकाडे यांना स्टेशन डायरीची धुरा देण्यात आली. त्यांनी बुधवारी दिवसभर स्टेशन डायरीचे कामकाज योग्यरित्या सांभाळले. याव्यतिरिक्त नांदगाव पेठ ठाण्यात महिला पोलिसची नियुक्त नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)
महिलांचा सन्मान व्हावा, त्यांनीही ठाणेदार पदाच्या कामकाजाचा अनुभव यावा, या दृष्टीने महिला दिनी त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
- दत्तात्रय मडंलिक,
शहर पोलीस आयुक्त