समाजाला बदलविण्याची महिलांमध्ये ताकद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 03:10 PM2019-10-18T15:10:09+5:302019-10-18T15:17:14+5:30
'महिलांनी आपल्या आंतरिक गुणाचा विकास करून हिंमत व संघष कायम ठेवल्यास ती स्वत:ला सिद्ध करू शकते, राष्ट्र व समाजाला बदलू शकते.'
गुरुकुंज मोझरी (अमरावती) - महिलांनी आपल्या आंतरिक गुणाचा विकास करून हिंमत व संघष कायम ठेवल्यास ती स्वत:ला सिद्ध करू शकते, राष्ट्र व समाजाला बदलू शकते, असे प्रतिपादन महिला वक्त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवात आयोजित महिला संमेलनात गुरुकुंज मोझरी येथे केले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ‘कौन बनेगा करोडपती?’च्या विजेत्या बबीता ताडे, रेखा बेलसरे, संजीवनी ठाकरे, ज्योती सैरिसे, प्रभा आवारे, पंचायत समिती सभापती अर्चना वेरुळकर, मोझरीच्या सरपंच विद्या बोडखे, पंचायत समिती सदस्य रंजना पोजगे, विस्तार अधिकारी संजय पुनसे, जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अर्चना कळंबे, गटविकास अधिकारी किरण गावंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रेखा बेलसरे, संजीवनी ठाकरे, प्रभा आवारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमापूर्वी निवडणूक दूत बबिता ताडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन केले. ‘बेटी बचाओ’ ही नाटिका यावेळी सादर करण्यात आली. त्याचे संयोजन रूपाली महल्ले यांनी केले होते. तन्वी पवार या चिमुकलीने ‘सावित्रीची लेक’ ही एकल नाटिका सादर केली. मीना बारबुद्धे यांनी ‘मानवतेचे पुजारी’ ही कविता सादर केली. याप्रसंगी राष्ट्रसंत संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांची भजने सादर केली. त्याचे संयोजन जया सोनारे यांनी केले होते. महिला संमेलनाचे प्रास्ताविक माधुरी भोयर यांनी केले. संचालन साक्षी पवार व आभार प्रदर्शन सरिता चिकटे यांनी केले.