दारू दुकानाला महिलांचा विरोध
By admin | Published: May 25, 2017 12:08 AM2017-05-25T00:08:37+5:302017-05-25T00:08:37+5:30
स्थानिक आशियाड कॉलनी शेगाव चौकात परिसरातील साईनिर्माण अपार्टमेंटमध्ये नवीन दारू दुकान सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
पालकमंत्र्यांना निवेदन : कुठल्याही परिस्थितीत दुकान नकोच
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक आशियाड कॉलनी शेगाव चौकात परिसरातील साईनिर्माण अपार्टमेंटमध्ये नवीन दारू दुकान सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र या परिसरात दुकान नकोच, अशी मागणी बुधवारी या परिसरातील महिलांनी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाव्दारे केली आहे.
आशियाड कॉलनी परिसरातील साईनिर्माण अपार्टमेंटमध्ये नवीन दारूचे दुकान सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. हा परिसर अतिशय वर्दळीचा असून या मार्गावर महिला, मुली, वृध्द व नागरिकांनी ये-जा असते, अतिशय गजबजलेल्या या ठिकाणी दारूचे दूकान सुरू झाल्यास सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दारू दूकानासाठी काही मंडळी प्रशासकीयस्तरावर जोरदार प्रयन्न करीत असल्याचे येथील महिलांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. येथील नागरिकांची दिशाभूल करून दारू दुकानाचा परवाना मिळविण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. दुकाना विरोधात महिलांच्या तीव्र भावनांचा आदर करून या ठिकाणी दारू दूकान सुरूच होवू नये अशी मागणी निवेदनाव्दारे महिलांनी केली आहे. दरम्यान याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पालकमंत्री पोटे व जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले आहे.
यावेळी अर्चना सपकाळ, मीना पुंडकर, माधवी देशमुख, वैशाली देशमुख, शिल्पा बिरोले, अलका तलवारे, सोनाली पिंजरकर, रेणूका जगताप, शालीनी वाघ, स्वाती केकान, शोभा उईके, अलका बानोकार आदीं उपस्थित होते.