ग्रामीण भागातील महिला परतल्या चुलीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:21 AM2018-04-03T00:21:16+5:302018-04-03T00:21:16+5:30
चुलीवरच्या स्वयंपाकाने महिलांचे डोळे चुरचुरतात. छातीत धूर दाटतो. सरपणासाठी जंगलतोड होते. अशा अनेक कारणांमुळे गॅस सिलिंडरला पसंती मिळाली. तथापि, दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या किमती वाढत असल्याने गावंखेड्यांतील मजूर महिला स्वयंपाकासाठी परत चुलीकडे वळल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : चुलीवरच्या स्वयंपाकाने महिलांचे डोळे चुरचुरतात. छातीत धूर दाटतो. सरपणासाठी जंगलतोड होते. अशा अनेक कारणांमुळे गॅस सिलिंडरला पसंती मिळाली. तथापि, दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या किमती वाढत असल्याने गावंखेड्यांतील मजूर महिला स्वयंपाकासाठी परत चुलीकडे वळल्या आहेत.
इंधन म्हणून वापरला जाणारा एलपीजी गॅस केवळ सुखी लोकांच्या घरातच प्रवेश करू शकला. शहरी भागात याची व्याप्ती ९५ टक्क््यांपर्यंत पोहोचली आहे. मात्र, ग्रामीण भागातील ५० टक्के कुटुंबांना शेगडीची बटन कशी फिरवायची, याची उत्सुकता आहे. ५० टक्के घरी मातीच्या चुलीच स्वयंपाकघराचे अधिष्ठान बनले आहे. त्यामध्ये सरपण म्हणून लाकडे, शेणाच्या गोवऱ्या व काही भागात कोळशाचा वापर केला जातो. सरपण चुलीत जळताना मोठ्या प्रमाणात धुराचे लोट ओकले जातात. निर्धूर चुलीची संकल्पनाही बहुतांश ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचलेली नाही. धुराच्या लोटात चूल फुंकताना महिलांच्या डोळ्यांतून सतत अश्रू बाहेर पडतात. त्यांना डोळ्यांचे आजार, फुफ्फुसाचे विकार, त्वचारोगांना बळी पडावे लागते. सरपणासाठी रानावनात जीव धोक्यात घालून भटकावे लागते. सुरुवातीला ज्यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकाचा गॅस घेतला, त्यापैकी बहुतांश ग्रामीण कुटुंबांमध्ये तो शोभेची वस्तू म्हणून उभा आहे. एक तर जवळपास एजन्सी नाही. त्यातच अनुदान जमा होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे रोजमजुरी पाडून कोणी हा महागमोलाचा उपद्व्याप करायचा, अशी भावना महिलांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे.
पूर्वी गॅस सिलिंडरचे दर कमी होते. आता दिवसेंदिवस भाव वाढत आहेत. मजुरी करणाºयांनी गॅस भरून कसा आणायचा? त्यामुळे स्वयंपाकासाठी चुलीकडे वळली आहे.
- शालूबाई गांवडे,
तिवसा
महागाईसोबत गॅसचे भाव वाढले. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आमच्यापर्यंत आली नाही. चुलीसाठी इंधन आणावे लागते. अडचणी खूप आहेत. पण पर्याय नाही.
- संगीता लांडगे,
तिवसा
शाळा चूलमुक्त करा
बहुसंख्य शाळांमध्येही सरपणाचा वापर करूनच मध्यान्ह भोजन तयार केले जाते. तेथेही महिला स्वयंपाकी चुल फुंकूनच अन्न शिजवितात. शालेय परिसरात धूर पसरल्याने याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. शासनाने शाळांना अनुदानीत सिलींडरचा पुरवठा करून शाळा धुरमुक्त करण्याची मागणी होत आहे.