दारू दुकानापुढे महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 09:52 PM2018-04-07T21:52:58+5:302018-04-07T21:52:58+5:30
येथील दलितवस्तीतील देशी दारूच्या दुकानाकरिता आलेला माल दुकान उघडून आत ठेवण्याचा मनसुबा स्त्रियांनी उधळून लावला. त्यांनी रात्रभर ठिय्या देत दुकान उघडण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे संपूर्ण दारूमुक्तीचा रिद्धपूर येथील महिलांचा निर्धार प्रकट झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिद्धपूर : येथील दलितवस्तीतील देशी दारूच्या दुकानाकरिता आलेला माल दुकान उघडून आत ठेवण्याचा मनसुबा स्त्रियांनी उधळून लावला. त्यांनी रात्रभर ठिय्या देत दुकान उघडण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे संपूर्ण दारूमुक्तीचा रिद्धपूर येथील महिलांचा निर्धार प्रकट झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ३१ मार्च २०१७ पासून रिद्धपूर येथील दलितवस्तीतील देशी दारूचे दुकान बंद आहे. यामुळे येथील नागरिकांना मद्यपींचा त्रास पूर्णत: बंद झाला. तथापि, देशी दारूच्या दुकानाच्या मालकाने परवान्याचे नूतनीकरण केल्यानंतर ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पिकअप वाहनात देशी दारूच्या पेट्या दुकानामध्ये विक्री करण्याकरिता आणल्या होत्या. त्याची चाहूल लागताच परिसरातील महिलांनी मद्यविक्री दुकानाच्या गेटवर ठिय्या दिला. त्यामुळे मद्यविक्रेत्याला पेट्या आत नेता आल्या नाही वा दुकानही उघडता आले नाही. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, शनिवारी वृत्त लिहिस्तोवर महिला येथून हटल्या नव्हत्या. ठाणेदारांनी सायंकाळी गावाला भेट दिली. सदर दुकान तीन न उघडण्याचे फर्मान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बजावले.
दुकान न्यावे गावाबाहेर
देशी दारू दुकानाबाबत १ मे २०१७ रोजीच्या ग्रामसभेमध्ये देशी दारूचे दुकान कायमचे बंद करण्याचा ठराव घेतलेला आहे. तथापि, हे दुकान गावाबाहेर स्थलांतरित करावे, असे या महिलांनी सांगितले.
श्रीक्षेत्र रिद्धपूर हे ‘ब’ दर्जाप्राप्त गाव आहे. देशी दारूचे दुकान मध्यवस्तीत आहे. ते गावाबाहेर स्थलांतरित केले, तर येथील नागरिकांच्या सोईचे होईल.
- गोपाल जामठे, सरपंच