गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत महिला असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:12 PM2017-12-09T22:12:14+5:302017-12-09T22:12:44+5:30
साईनगर परिसरात दिवसाढवळ्या तरुणीचा खून , विद्यार्थिनीवर उकळते तेल टाकून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न या घटनांची शाई वाळते न वाळते तोच गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत महिलांची सुरक्षिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : साईनगर परिसरात दिवसाढवळ्या तरुणीचा खून , विद्यार्थिनीवर उकळते तेल टाकून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न या घटनांची शाई वाळते न वाळते तोच गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत महिलांची सुरक्षिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील महिला आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून पोलिसांनी तक्रारींचे तात्काळ दखल घेण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलेत. तथापि, त्यानंतरही महिला असुरक्षितच असल्याचे वास्तव गाडगेनगर हद्दीत घडलेल्या पाच घटनांवरून दिसून आले आहे.
व्हीएमव्हीसमोरील रोडवर एका तरुणीला भर रस्त्यावर केस ओढून मारहाण करण्यात आली. दुसरी घटना विद्यापीठ परिसरातील कॉलनीत घडली. एका ६५ वर्षीय महिलेला जुन्या वादातून महिलेस मारहाण केली. विशेष म्हणजे, अंगावर अॅसिड फेकण्याची धमकी तिला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतके गंभीर प्रकार शहरात घडत असताना आपल्या कार्यक्षेत्रात ‘स्ट्राँग पोलिसिंग राबविण्यासह असामाजिक तत्त्वांवर अंकुश राखण्यात गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.
सरस्वतीनगरात महिलेस मारहाण
अमरावती : सरस्वतीनगरात एक इसम एका महिलेस मारहाण करीत होता. काही नागरिक धावून गेले. यावेळी तो पती-पत्नीचा वाद असल्याचे लक्षात आले. पत्नी सहा महिन्यांपूर्वी घरून निघून गेली होती. पती शोध घेत सरस्वतीनगरात आला. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
महिलेच्या अंगावर अॅसिड फेकण्याची धमकी
विद्यापीठ परिसरातून ६५ वर्षीय महिला जात असताना राहुल गौतम खंडारे याने जुन्या वादातून तिला मारहाण केली. तिच्या नातेवाईकसोबत झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे न दिल्यास अंगावर अॅसीड फेकण्याची धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच राहुलला अटक केली. या घटनेमुळे धास्तावलेल्या तक्रारकर्त्या महिलेच्या कुटुंबीयांनी शनिवारी पोलीस आयुक्तालय गाठले.
घरात घुसून महिलेकडील सिम पळविले
गाडगेनगर हद्दीतील एक घरात इसम शिरला आणि माझ्याशी बोलत नाही, असे म्हणत ३० वर्षीय महिलेच्या मोबाइलचे सीमकार्ड घेऊन पसार झाला. पोलिसांनी युवराज टाले (३५, रा. स्वावलंबीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
नारायणनगरात विवाहितेचा छळ
विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा शुक्रवारी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश ऊर्फ फफुर्डा राऊत, किशन, शंकर, विनोद, कैलास व दोन महिला (सर्व रा. लखाड, अंजनगावसुर्जी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
भररस्त्यात केस ओढून तरूणीला मारहाण
एक २५ वर्षीय तरुणी शुक्रवारी सायंकाळी व्हीएमव्ही कॉलेजसमोरील रस्त्यावरून जात असताना एक तरुण तिचे केस ओढून मारहाण करतो. हा प्रकार भर रस्त्यावर घडत असताना अनेक जण बघ्याची भूमिका घेतात. विशेष म्हणजे, शुक्रवारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील अमरावती शहरात होते. त्यांनी महिला सुरक्षेसंबंधी आढावा बैठक पोलीस आयुक्तालयात घेतली. यादरम्यान ही घटना घडली. याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कुचराई न करता घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. ठाणेदार मनीष ठाकरेसुद्धा घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावर चौकशी केल्यानंतर हे कृत्य आरोपी अमोल मालखेडे (३२,रा. अमरनगर) याने केल्याची बाब पुढे आली. त्याला अवघ्या तासाच्या आत पोलिसांनी अटक केली.