"महिला कुस्तीपटूंवरील अत्याचार देशाच्या संस्कृतीसाठी कलंक", अमरावतीतील संघटनांचा सूर
By उज्वल भालेकर | Published: May 9, 2023 07:00 PM2023-05-09T19:00:47+5:302023-05-09T19:01:09+5:30
कुस्ती खेळाडूंच्या समर्थनार्थ अमरावतीतही मंगळवारी धरणे; सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा संघटनांचा सहभाग
उज्वल भालेकर, अमरावती: महिला कुस्ती खेळांडूचे लैंगिक शोषण व अत्याचार विरोधात मागील १५ दिवसांपासून राजधानी नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर कुस्तीपुटूंचे आंदोलन सुरु आहे. खेळांडूवरील अत्याचार हे भारतीय संस्कृतीसाठी कलंक असल्याचे सांगत, शहरातील विविध सामाजिक संघटना व खेळांडूनी एकत्र येत खेळाडूंच्या समर्थनामध्ये मंगळवारी शहरातील डॉ. आंबेडकर चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळांडूनी लैंगिक शोषणाचे आरोप केेल्याने देशभरातून या प्रकरणात राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रीया उमटत आहेत. बृजभूषण यांना अटक व्हावी यासाठी देशाची शान उंचावणारे कुस्तीपटू जंतरमंतर वर २३ एप्रिलपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनदरम्यान पोलीसांकडून कस्तीपटूंना मारहाणही झाल्याचे आरोप आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून भारताचे भूषण ठरलेल्या महिला खेळाडूंवर जर लैंगिक अत्याचार होत असतील तर जगात आपल्या देशाची अप्रतिष्ठा करणारी ही गंभीर व संतापजनकबाब असल्याचे एकदिवसय धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांचे म्हणने आहे.
त्यामुळे अन्याय-अत्याचारा विरोधात लढा देत असलेल्या महिला कुस्तीपटूंसोबत उभे राहणे हे भारत देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. त्यामुळे कुस्तीपटूच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अमरावती मधील क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, महिला संघटना, खेळाडू तसेच सर्व संवेदनशील नागरिकांनी एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी प्रा अंबादास मोहिते, कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई बोंडे, किशोर बोरकर, मधुकर अभ्यंकर, जगदिश गोवर्धन, माजी नगरसेवक भूषण बनसोड, कॉँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष अंजली ठाकरे सह इतर शहरातील राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.