महिला दिन विशेष : नकोशी ते हवीहवीशी अशी सुरेल गांधारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:24 PM2023-03-08T12:24:59+5:302023-03-08T12:27:32+5:30
उकिरड्यावर भिरकावून दिलेली दिव्यांग मुलगी ते स्वत:च्या पायावर उभी युवती
मनीष तसरे
अमरावती : मुलगी, त्यातही अंध. यामुळे घाबरलेल्या मात्या-पित्यांनी तिला शब्दश: उकिरड्यावर टाकले. पंढरपुराहून अचलपुरात आणलेल्या या हाडामासाच्या गाेळ्याला शंकरबाबांनी आकार दिला. गाता गळा पाहून गायन-संगीताची शास्त्रशुद्ध तालीम तिला दिली. आज ती गांधारी शंकरबाबा पापळकर या नावाने ओळखली जाते. अनेक बड्या कार्यक्रमांमध्ये तिने आपल्या गाेड गळ्याने उत्कृष्ट गीते सादर करून मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. स्वत:च्या पायावर ती समर्थपणे उभी झाली आहे.
शंकरबाबांनी गांधारीला इयत्ता चौथीपर्यंत यशवंत अंध विद्यालयात शिकविले. त्यानंतर अमरावतीच्या डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात तिने सातवीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे परतवाड्याच्या आय.ए.एस. हायस्कूलमध्ये बारावीपर्यंत ती शिकली. पुढे तिने पदवी शिक्षणासाठीही प्रवेश घेतला. शिकत असतानाच तिने संगीताच्या आठ परीक्षा उत्तीर्ण केल्या.
गांधारी आता कक्ष सेविका या पदावर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहे. ती दररोज सकाळी ८ ते ४ वेळेत रुग्णालयात आजारी मुलांना म्युझिक थेरपी देते. आजारी मुलांसाठी मनोरंजनासाठी गाणे म्हणते तसेच त्यांच्यासाठी प्रार्थना करते. हा तिचा नित्याचाच क्रम आहे. याशिवाय तिला दिलेली कामे ती नियमित करते.
अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार
२०२२ च्या डिसेंबर महिन्यात मुंबई येथे एका कार्यक्रमादरम्यान अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि अनुराधा पौडवालसुद्धा उपस्थित होत्या. या ठिकाणी गांधारी हिने स्वागतपर गीत वाद्याविना गायिले. संपूर्ण सभागृह तिच्या गीताने गहिवरले. यावेळी गांधारीचे अनुराधा पौडवाल यांनी कौतुक केले, तर मुख्यमंत्र्यांनी तिला ११ हजारांचा धनादेश दिला.
अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली मदत
अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गांधारीची भेट वझ्झर येथे घेतली. तिने स्वत:च्या पायावर उभे राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शिक्षण योग्य पद देण्याचे कबूल केले. त्यानुसार कक्ष सेविका म्हणून तिला अमरावतीच्या सुपर हाॅस्पिटलमध्ये ती रुजू झाली आहे.