अवैध दारू विक्रीविरुद्ध महिलांचा एल्गार

By admin | Published: March 20, 2017 12:11 AM2017-03-20T00:11:31+5:302017-03-20T00:11:31+5:30

नजीकच्या कांडली परिसरातील अवैध दारू विक्रीविरुद्ध एकतानगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या त्रस्त महिलांनी शुक्रवारी पोलिसांसह उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Women's Elgar Against Illegal Sales | अवैध दारू विक्रीविरुद्ध महिलांचा एल्गार

अवैध दारू विक्रीविरुद्ध महिलांचा एल्गार

Next

पोलिसांना निवेदन : कांडलीत दारुड्यांकडून महिलांना शिवीगाळ
परतवाडा : नजीकच्या कांडली परिसरातील अवैध दारू विक्रीविरुद्ध एकतानगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या त्रस्त महिलांनी शुक्रवारी पोलिसांसह उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
परतवाडा शहराला लागून असलेल्या कांडली, कविठा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्याची ओरड गेल्या अनेक दिवसांपासून होती. एकतानगर झोपडपट्टी परिसरात अवैध दारु, गांजा आदींचा व्यवसाय होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकदा स्पष्ट झाले आहे. तरीसुद्धा अवैध दारू विक्रेत्यांची मुस्कटदाबी करण्यात पोलीस यंत्रणा कमकुवत झाल्याचे चित्र आहे. अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना रस्त्याने कामानिमित्त ये-जा करणे कठीण झाले आहे. अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय या परिसरात आहे. दारू गुत्यावरून येणारे मद्यपी अश्लील शिवीगाळ करतात, अशी तक्रार त्रस्त महिलांनी निवेदनात केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

दारू विक्रेत्यांची नावे जाहीर
फगनसिंग इवने आणि सोनू गोपी बेदरकर हे दोघे परिसरात राजरोसपणे अवैध दारुचा व्यवसाय करीत असल्याचे थेट पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्रस्त महिला व नागरिकांनी म्हटले असून त्यांना दारू विक्रीविरुद्ध विरोध केल्यास अश्लील शिवीगाळ देऊन धमकावण्यात येत असल्याने या अवैध दारू विक्रेत्यांची परिसरात दहशत पसरली आहे.
मंदिर परिसरात धिंगाणा
अवैध दारू अड्ड्यावरून दारू पिऊन आल्यावर मंदिर परिसरात दारुडे धिंगाणा घालत असल्याने भक्तांना मंदिरात जाणे कठीण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी चंद्रकला इंगळे, वंदना तायडे, प्रिया मनोहरे, सविता मानकर, पूजा रनगिरे, पंचफुला नितनवरे, माला शिरभाते, पुष्पा चव्हाण, मंगला चरपे, अरुणा नितनवरे, अनिता मानेकर, कल्पना घोम, अर्चना पाठक, अनिता सदाफळे या दक्षता समितीच्या महिलांसह मैत्री महिला गट, तेजस्वीनी महिला संघासह सुमेत वानखडे, प्रफुल्ल मोरे, राजेश इंगळे, उल्हास मोरे आदी शंभरावर नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Women's Elgar Against Illegal Sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.