जुना धामणगावात कर्जाच्या नावावर महिलांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:59 PM2019-03-19T21:59:01+5:302019-03-19T21:59:19+5:30
खादी ग्रामोद्योग विभागाचे कर्मचारी असल्याची बतावणी करीत कर्जाच्या नावावर ३५ महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार जुना धामणगाव येथे उघड झाला.
धामणगाव रेल्वे : खादी ग्रामोद्योग विभागाचे कर्मचारी असल्याची बतावणी करीत कर्जाच्या नावावर ३५ महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार जुना धामणगाव येथे उघड झाला.
महिलांनी विक्रम लाड (५०) व नितीन इंगोले (४५) या दोन तोतयांविरुद्ध मंगळवारी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, लाड व इंगोले यांनी १२ मार्च रोजी जुना धामणगावातील एका महिलेच्या घरी महिलांची बैठक घेतली. आपण खादी ग्रामोद्योग विभागाचे कर्मचारी असून, सर्व महिलांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये बेसिक कर्ज देऊ, अशी बतावणी केली. आधार कार्ड, मतदान कार्ड, छायाचित्र व प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्याचे त्यांनी सुचविले. त्यानुसार, ३५ महिलांनी प्रत्येकी एक हजार रुपये या दोन्ही तोतयांना दिले. १८ मार्च रोजी धामणगाव येथील स्टेट बँकेत सकाळी दहा वाजता येण्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार महिलांनी बँकेत गर्दी केली. मात्र, दिलेल्या वेळेला दोघेही आले नाहीत. त्यांचा मोबाइल बंद आढळून आल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यानंतर सर्व महिलांनी दत्तापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दत्तापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे या घटनेचा तपास करीत आहेत.