अमरावतीत महिला राज! सहा कर्तृत्ववान महिलांच्या हाती आहे जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 12:33 PM2021-07-15T12:33:22+5:302021-07-15T12:33:46+5:30

Amravati News पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, खासदार नवनीत राणा, सोबतच प्रशासकीय पातळीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे-मेंढे. हे राजकीय-प्रशासकीय वर्तुळ पूर्ण केले ते नवनियुक्त जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी.

Women's Raj in Amravati! The district is in the hands of six capable women | अमरावतीत महिला राज! सहा कर्तृत्ववान महिलांच्या हाती आहे जिल्हा

अमरावतीत महिला राज! सहा कर्तृत्ववान महिलांच्या हाती आहे जिल्हा

googlenewsNext
ठळक मुद्देया महिलांनी एकमेकींच्या हातात हात घालून विकासाचा भगीरथ पेलावा, ही अमरावतीकरांची अपेक्षा !

गजानन चोपडे

 लोकमत न्यूज नेटवर्क  
अमरावती : आई अंबादेवीचे माहेरघर, महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी, सुसंस्कृत शहर, महिलांच्या प्रगतीची मोहोर थेट राष्ट्रपती भवनापर्यंत उमटलेली अशा अंबानगरीत महिलाशक्तीचा दुग्धशर्करा योग सध्या जुळून आलाय. अमरावतीच्या राजकीय, प्रशासकीय क्षितिजावर महिलाशक्तीचे देदीप्यमान तेज झळाळून उठलेय. एक वर्तुळ पूर्ण होतेय.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर,  आमदार सुलभा खोडके,  खासदार नवनीत राणा, सोबतच प्रशासकीय पातळीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे-मेंढे. हे राजकीय-प्रशासकीय वर्तुळ पूर्ण केले ते नवनियुक्त जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी. शैलेश नवाल यांची बदली झाली अन् रिचा बागला यांच्यानंतर आठ-दहा वर्षांनी जिल्हा दंडाधिकारी म्हणून आयएएस महिला येथे रुजू झाली.

वर्तुळ पूर्णत्वाकडे चालले ते यासाठी की, राजकारणातील स्थानिक पातळीवरची तीनही प्रमुख पदे महिलांकडे. राणा, ठाकूर, खोडकेंनी राजकारणात आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. इकडे प्रशासकीय पातळीवर शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारे महत्त्वाचे पदही डॉ. सिंग यांच्या रूपाने महिलाशक्तीकडे, तर जिल्ह्याच्या नियोजनातही एक महिला अधिकारीच आहे. आता त्याला जोड मिळाली ती महिला कलेक्टरची. अमरावती जिल्ह्याच्या, शहराच्या विकासासंदर्भात, नियोजनासंदर्भात जेव्हा-जेव्हा बैठका होतील तेव्हा पहिल्या रांगेत या महिलाशक्तीचा जागर असेल. पहिल्या रांगेत बसलेल्या या महिला अधिकारी-पदाधिकाऱ्यांची उठबैस इतिहासात नोंद करणारी असेल.

अगदी पूर्वीपासून ‘ताईंचा जिल्हा’ अशी अमरावतीची ओळख. प्रतिभाताई पाटलांनी तर ‘राष्ट्रपती’ हे सर्वोच्च पदही गाठले. अमरावतीचा चेहरामेहरा पालटविण्यात ‘ताईंचा’ मोलाचा वाटा. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तो ‘ताईं’च्या उल्लेखाशिवाय अपूर्ण असेल.

प्रतिभाताईंसोबतच उषा चौधरी यांनी लोकसभेत अमरावतीचे प्रतिनिधित्व केले. अचलपूरच्या आमदार वसुधा देशमुख यांनी अमरावतीचे पालकमंत्रिपद भूषविले, तर अलीकडे सुरेखा ठाकरे यांनी मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दोनदा भूषविले.

सध्या अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची जबाबदारीदेखील महिलेकडेच. अशा रीतीने जिल्हाधिकारीपदी महिलेची नियुक्ती झाल्याने प्रशासकीय बैठकीत पाच महिला खुर्चीला खुर्ची लागून बसतील. पुरोगामी अमरावती शहरासाठी ही एक भूषणावह बाब आहे. शासनाकडून होणाऱ्या निर्णयाची, योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेकडे. पालकमंत्री म्हणून यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, खासदार नवनीत राणा यांनी निर्देश द्यायचे आणि अंमलबजावणी करायची ती जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी.

Web Title: Women's Raj in Amravati! The district is in the hands of six capable women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला