महिलांची छळछावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 09:56 PM2018-11-03T21:56:51+5:302018-11-03T21:58:09+5:30

सुशिक्षितपणाचा टेंभा मिरवणाऱ्या अमरावती जिल्ह्यात महिलांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय आहे. गेल्या ४८ तासांत पोलिसांनीच त्यांच्याकडे दाखल तकारींवरून नोंदविलेल्या गुन्ह्यांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

Women's torture | महिलांची छळछावणी

महिलांची छळछावणी

Next
ठळक मुद्देजिल्हा असुरक्षित : स्त्रियांची अब्रू एवढी का स्वस्त वाटते?

अमरावती : सुशिक्षितपणाचा टेंभा मिरवणाऱ्या अमरावती जिल्ह्यात महिलांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय आहे. गेल्या ४८ तासांत पोलिसांनीच त्यांच्याकडे दाखल तकारींवरून नोंदविलेल्या गुन्ह्यांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. महिलांची अब्रू, तिची अस्मिता काही जणांना एवढी स्वस्त का वाटते, हा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. महिलांची अब्रू घेणे, विनयभंग, फूस लावून पळविण्याच्या घटनांचा ओघ थांबलेलाच नाही.
राजनीकुंड येथे महिलेचा विनयभंग
चिखलदरा : तालुक्यातील राजनीकुंड येथे २३ वर्षीय अनिल ऊर्फ बन्सू चंद्रभान रेचे याने ३० वर्षीय विवाहितेच्या घरात शिरून तिला मोबाइल क्रमांक मागितला आणि विनयभंग केला. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी भादंविचे कलम ४५१, ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दिराकडून विवाहितेचा विनयभंग
शिरजगाव कसबा : येथील जुनापुरा भागात दिराने विवाहितेचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांना नुकतीच प्राप्त झाली. याप्रकरणी पोलिसांनी मुमताजीन खान मुशीर खान याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंदविला. २७ आॅक्टोबर रोजी घडलेल्या घटनेची तक्रार २२ वर्षीय विवाहितेने दिली.
मुलीला फूस लावून पळविले
परतवाडा : येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने १६ एप्रिल रोजी पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने परतवाडा पोलिसांत १ नोव्हेंबर रोजी दाखल केली. यावरून परतवाडा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मलकापूर येथे विवाहितेचा विनयभंग
शेंदूरजनाघाट : नजीकच्या मलकापूर येथे ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी अशोक सर्जेराव दवंडे (५६) याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यात आली. विवाहितेने आरडाओरडा केल्याने तेथे आलेल्या सासू व पतीला अशोकने ढकलले आणि शिवीगाळ करून पळ काढला. पोलिसांनी भादंविचे कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महाविद्यालयीन तरुणीची छेड, विनयभंग
परतवाडा : स्थानिक अचलपूर रस्त्यावरील एका कोचिंग क्लासमध्ये राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचे धडे गिरविणाºया महाविद्यालयीन तरुणीची छेड काढण्यात आली. हा प्रकार १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास घडला. १९ वर्षीय ती तरुणी वर्ग संपवून घरी जाण्यास निघाली असता, आरोपी सागर विनोद धोंडे (रा. इनायतपुरा, परतवाडा ठाणे) याने तिची छेड काढली. माझ्यासोबत प्रेम न केल्यास तुझे लग्न होऊ देणार नाही, यात तुझे भाऊ आणि वडील आडवे आल्यास त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार परतवाडा पोलिसात दाखल करण्यात आली. या तरुणीला शिवीगाळही करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४ड, ५०४, ५०६ भादनंविअन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गाडगेनगर हद्दीत तीन महिलांचे विनयभंंग
गाडगेनगर ठाण्याच्या विविध परिसरात तीन महिलांचे विनयभंग झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. पहिल्या घटनेत महिलेस अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना गुरुवारी गाडगेनगर हद्दीत घडली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजू धनावरेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरी गेट हद्दीत बालिकेचा विनयभंग
घरासमोर खेळणाºया बालिकेला घरात बोलावून तिच्याशी अश्लिल चाळे करण्यात आल्याची घटना ३१ आॅक्टोंबर रोजी नागपुरी गेट हद्दीत घडली. याप्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी शेख राजीक शेख करीम (३८) याचेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
भातकुलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अल्पवयीन मुलगी मावशीच्या घरी राहायला असताना आरोपीने तिच्या घरात घुसून विनयभंग केला. या प्रकाराचा मावशीनेही विरोध केला असता, मावशीलादेखील मारहाण करण्यात आली.
या प्रकरणात भातकुली पोलिसांनी विक्की विजय मोहोडविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
पादचारी महिलेच्या गळ्याला लावला चाकू
दुसरी घटना एनसीसी भवनासमोर घडली. महिला पायी जात असताना एक कार महिलेजवळ थांबली. कारमधील सचिन गुल्हाने नामक व्यक्तीने माहितीचा अधिकार मागे घ्या, अन्यथा वाईट परिणामास सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच गळ्याला चाकू लावून ओढाताण केल्याचाही आरोप महिलेने केला आहे.
अ‍ॅसिड फेकण्याची महिलेस धमकी
भिसी योजनेतील पैशांच्या कारणावरून एका महिलेस अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आली. रामपुरी कॅम्प परिसरात गुरुवारी ही घटना घडली. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी श्याम डोडवाणीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Women's torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.