दारूबंदीसाठी महिलांची ‘वीरूगिरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 12:12 AM2017-06-10T00:12:45+5:302017-06-10T00:12:45+5:30
न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूचे दुकान बंद केल्याने तालुक्यातील व तिवसा शहरातील दारूची दुकाने बंद झाली होती.
अखेर पाच दिवसांसाठी दुकान बंद : तळेगावात पोलिसांसोबत झटापट
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूचे दुकान बंद केल्याने तालुक्यातील व तिवसा शहरातील दारूची दुकाने बंद झाली होती. त्यामुळे तिवसा तालुक्यातील एकमात्र तळेगाव ठाकूर येथील देशी दारू दुकानाकडे तळीरामांनी मोर्चा वळविला होता. या दुकानामुळे तळेगाव ठाकूर येथील अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने याविरोधात महिलांनी एल्गार पुकारला आहे. याअनुषंगाने शुक्रवारी ९ जून रोजी गावातील देशी दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी गावातील हजारो महिलांनी एकत्र येऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’स्टाईल आंदोलन केले.
दरम्यान दंगा नियंत्रण पथक व तिवसा पोलिसांनी महिलांना पाण्याच्या टाकीवर चढण्यास मज्जाव केला. पाण्याच्या टाकीजवळ आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी अडवून ठेवले होते. यावेळी महिला व पोलिसांमध्ये झटापट देखील झाली. अखेर दुपारी २ वाजता तिवसा येथील तहसीलदारांनी तात्पुरत्या स्वरूपात शुक्रवारपासून पाच दिवस देशी दारूचे हे दुकान बंद करण्याचे आदेश देत दुकानाला कुलूप ठोकले. मात्र, सहाव्या दिवशी हे दुकान सुरू झाल्यास कोणतेही आंदोलन न करता हे दुकान थेट पेटवून देण्याचा इशारा महिला आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.
१० हजार लोकवस्तीच्या तळेगाव ठाकूर येथील शासनमान्य परवानाधारक या देशी दारू दुकानात बाहेरील नागरिक दारू पिण्यास येत असल्याने गावातील शांततेला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी अनेकदा दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी निवेदने दिलीत. मात्र, कारवाई झाली नाही. त्यामुळे ठरल्यानुसार महिलांनी शुक्रवारी सकाळपासून गावातील हजारो महिलांनी नारेबाजी करीत गावातून रॅली काढली व ११.३० वाजता हजारो महिला-पुरूष पाण्याच्या टाकीवर चढण्यासाठी आल्यात. मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच अडून ठेवले. त्यामुळे पोलीस व महिलांमध्ये चांगलीच झटापट झाली. मात्र, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.