बडनेऱ्यातील वनकार्यालय शोभेची वास्तू
By admin | Published: March 9, 2017 12:20 AM2017-03-09T00:20:17+5:302017-03-09T00:20:17+5:30
बडनेऱ्यातील सहायक वन परिक्षेत्राधिकारी मुख्यालयाला सतत कुलूपच राहत असल्याने संबंधित तक्रारदारांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याची...
कायम कुलूप : शेतकरी, नागरिक त्रस्त, वन्य पशु-पक्ष्यांच्या शिकारीत वाढ
बडनेरा : बडनेऱ्यातील सहायक वन परिक्षेत्राधिकारी मुख्यालयाला सतत कुलूपच राहत असल्याने संबंधित तक्रारदारांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याची ओरड परिसरवासीयांची आहे. नुकत्याच हरीयल पक्ष्याच्या मृत्यूने याला दुजोरा मिळाला आहे.
वडाळी परिक्षेत्रांतर्गत बडनेरा नवीवस्तीत सहायक वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय आहे. बहुतांश लोकांना बडनेऱ्यात वनविभागाचे कार्यालय आहे हे देखील माहित नसल्याची स्थिती आहे. तक्रारदारांना खुप विचारपूस करून या कार्यालयापर्यंत पोहोचावे लागत असल्याचे बोलल्या जात आहे. त्यातच या कार्यालयाला कुलूप लागल्याचे पाहून त्यांचा मन:स्ताप अधिकच वाढतो आहे. विविध प्रकारच्या परवानग्या, तक्रारी घेऊन शेतकरी, व्यापारी या ठिकाणी जात असतात. १२ वाजल्यानंतर निश्चितच आपल्याला कोणीतरी कार्यालयात सापडतील, या आशेने तक्रारदार जात आहेत. मात्र आल्यापावली परतण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अधिकांश परिसर बडनेरानजीकचा कोंडेश्वर परिसर, म्हसला शिवार, बडनेरा परिमंडळात येतो. पर्यायाने मोठ्या संख्येत तक्रारदार या ठिकाणी येत असतात. नांदगाव तालुक्यात तितर, बटेरच्या शिकारींचे प्रमाण अधिक आहे. त्यासंबंधित गुन्हेदेखील आहेत. नुकतेच बडनेऱ्यात हरियालसह ११ पक्षांच्या मृत्यूने खळबळ उडविली. ही घटना उघडकीस आल्यानंतर तब्बल एक तास उशीराने वनविभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेत. या घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर बडनेऱ्यातील वनविभागाचे वर्तुळ कार्यालय आहे. घटनास्थळी परिसरवासीयांनी अमरावतीच्या वडाळी परीक्षेत्र कार्यालयाला संपर्क साधून पक्षांच्या मृत्यूची घटना कळविली. बडनेरा वर्तुळ कार्यालयीन ठिकाणी काही पक्षीमित्र गेले होते. मात्र कार्यालय बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. एकूणच वनविभाग आपल्या कामात कितपत गंभीर आहे हे यातून लक्षात येते. बडनेरावासीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये अशा कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना विविध परवानगी घेण्यासाठी बडनेऱ्यातील वनविभागाच्या कार्यालयात जावे लागते. कार्यालय बंदच राहत असल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे. वरिष्ठांनी याची दखल घ्यावी.
- अरुण साकोरे,
तालुका अध्यक्ष, शेतकरी संघटना
बडनेऱ्यातील वनविभागाचे वर्तुळ कार्यालय बंद राहत असेल तर तशा सूचना संबंधितांना दिल्या जाईल. यावर विशेष करुन लक्ष देऊ कामकाजानिमित्त तेथील कर्मचारी इतरत्र असतात.
- एच.व्ही. पडगव्हाणकर
आरएफओ, वडाळी वनक्षेत्र