खापर्डेवाड्याला ‘श्रीं’चा पदस्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:21 PM2019-02-24T22:21:12+5:302019-02-24T22:21:28+5:30
श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या हयातीत राजकमल चौकातील खापर्डेवाड्याला शेगाव निवासी राजाधिराज योगिराज संत गजानन महाराज यांनी भेट दिली होती. येथे काही वेळ त्यांनी विश्रांती घेतली होती. श्रींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या वाड्यात प्रकटदिनानिमित्त सोमवारी महाआरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम भक्तांनी आयोजित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या हयातीत राजकमल चौकातील खापर्डेवाड्याला शेगाव निवासी राजाधिराज योगिराज संत गजानन महाराज यांनी भेट दिली होती. येथे काही वेळ त्यांनी विश्रांती घेतली होती. श्रींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या वाड्यात प्रकटदिनानिमित्त सोमवारी महाआरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम भक्तांनी आयोजित केला आहे.
दासगणू महाराजांच्या ‘श्री गजानन विजयग्रंथ’मध्ये संत गजानन महाराजांच्या खापर्डेवाड्यातील वास्तव्याचा उल्लेख आढळून येतो. या वाड्यात एक विहीर असून, विहिरीच्या बाजूला एक चौथरा आहे. तेथे पूर्वी एक औंदुबर वृक्षसुद्धा होते. या झाडाखाली संत गजानन महाराज बसले होेते, असे जुने जाणते भाविक सांगतात. पण, सदर वृक्ष तोडण्यात आले. सदर वाडा श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या वंशजांनी काही वर्षांपूर्वी एका बिल्डरला विकल्याची माहिती आहे. त्यामुळे इतिहास व अध्यात्माचा संगम असूनही या ठिकाणी कुठलाही विकास झाला नाही. या एतिहासिक वाड्याचे महापालिकेने संवर्धन करावे, अशी मागणी भाविकांची कायम आहे. त्यासंदर्भातील फाईल मंत्रालयात धूळखात पडली आहे. या वाड्यात श्री संत गजानन महाराजांचे मंदिर व्हावे, असेही भाविकांना वाटते. दरवर्षी प्रकटदिनाला ‘श्रीं’ची आरती व पूजा केली जाते. या कार्यक्रमाला शेकडो भाविकांची उपस्थिती लाभते.
तो चौरंग पेटकरांच्या निवासस्थानी
दादासाहेब खापर्डे यांनी संत गजानन महाराज यांचे पूजन केले. यावेळी ते ज्या चौरंगावर बसले होते, तो चौरंग अद्यापही सुस्थितीत आहे. रविकिरण सोसायटीतील रहिवासी डॉ. आनंदराव पेटकर यांना खापर्डे कुटुंबीयांनी तो भेट दिला होता. प्रकटदिनाला त्या चौरंगाचीही पूजा केली जाते.