सरसंघचालकांच्या उद्बोधनाने रा. स्व. संघ विदर्भ प्रांत शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:39 PM2019-01-20T22:39:21+5:302019-01-20T22:41:11+5:30
अमरावती शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराचा समारोप रविवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उद्बोधनाने झाला. त्यानंतर शिबिरार्थी नव्या जोषाने परतीच्या प्रवासासाठी रवाना झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अमरावती शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराचा समारोप रविवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उद्बोधनाने झाला. त्यानंतर शिबिरार्थी नव्या जोषाने परतीच्या प्रवासासाठी रवाना झाले.
अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलानजीक १८ ते २० जानेवारी या तीन दिवसांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. या शिबिराची संपूर्ण जबाबदारी रा. स्व. संघ अमरावती महानगराकडे होती. रविवारी या शिबिराचा समारोप सरसंघचालकांच्या पाऊण तास झालेल्या उद्बोधनाने झाला. दुपारी साडेबारा वाजता शिबिराचे शेवटचे सत्र आटोपले. त्यानंतर शिबिरार्थिींचा भोजनाचा कार्यक्रमा झाला.
शिबिर स्थळी मुक्तागिरी नगरात सरसंघचालकांनी शिबिरार्थिंसोबत भोजन केले. त्यानंतर दुपारी ४ वाजता सरसंघचालक नागपूरकडे रवाना झालेत. शिबिराचा समारोप झाल्यानंतर विदर्भातून आलेल्या प्रवासी कार्यकर्त्यांचा लोंढा परतीच्या प्रवासासाठी शिबिरस्थळाहून बाहेर पडत होता. सरसंघचालक तीनही दिवस मुक्कामी असल्याने सुरक्षा यंत्रणा रात्रंदिवस तळ ठोकून होती. त्यांनीदेखील सुटकेचा श्वास घेतला. मकरसंक्रांतीच्या पर्वावर शिबिर असल्याने प्रत्येक शिबिरार्थिंना तीळगुळाचे वाटप करण्यात आले. संघाच्या विविध कार्यक्षेत्राची माहिती असणाऱ्या प्रदर्शनीला व शिबिरस्थळाला पाहण्यासाठी अमरावती जिल्ह्यासह दूरदुरून लोक याठिकाणी आले होते.
खासदारालादेखील थांबावे लागले
शिबिर स्थळाला भेट देण्यासाठी गडचिरोलीचे भाजपचे खासदार अशोक नेते यांना सरसंघचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या प्रवेशद्वारावर थांबावे लागले. संघाचे प्रमुख पदाधिकारी त्याठिकाणी आल्यानंतरच त्यांना आत जाता आले. त्यांच्या सुरक्षा रक्षक व सोबत्यांनादेखील प्रवेश मिळाला नव्हता. एकूणच शिबिरस्थळी स्वयंसेवकांनी त्याचबरोबर पोलीस यंत्रणादेखील चोख बंदोबस्तात तैनात करण्यात आली होती.
भाजप खासदार, आमदारांची शिबिर स्थळाला भेटी
पाच हजार प्रवासी कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीतील विदर्भ प्रांत शिबिरस्थळाला महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच खासदार व आमदारांनी भेटी दिल्यात. तीनही दिवस विविध भागातले मान्यवर देखिल येथे येवून गेलेत.