३५ हजार मजुरांना काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:28+5:30
दरवर्षी मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून हजारो मजूर बड्या शहरासह परराज्यात कामाच्या शोधात भटकंती करतात. दुसरीकडे मेळघाटात मग्रारोहयोच्या कामावर हजारो मजुरांची उपस्थिती असते. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊननंतर पूर्णत: कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब आदिवासींची फरपट झाली.
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा/परतवाडा : मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यामध्ये आठ दिवसांत मग्रारोहयो अंतर्गत विविध कामांना सुरुवात झाली आहे. चिखलदरा तालुक्यात २५ हजार, तर धारणी तालुक्यात १० हजार अशी एकूण ३५ हजार मजुरांची उपस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात मजुरांच्या हाताला काम देऊन आदिवासींचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला यश येत आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करीत अधिकाधिक रोजगार उपलब्ध केला जात आहे. जिल्ह्यात एकूण ४५ हजारांपैकी तब्बल ३५ हजार मजूर मेळघाटात कार्यरत आहेत.
दरवर्षी मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून हजारो मजूर बड्या शहरासह परराज्यात कामाच्या शोधात भटकंती करतात. दुसरीकडे मेळघाटात मग्रारोहयोच्या कामावर हजारो मजुरांची उपस्थिती असते. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊननंतर पूर्णत: कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब आदिवासींची फरपट झाली. यामुळे मग्रारोहयोची कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश महिला बाल विकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानंतर प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंगवर भर देत ग्रामपंचायत लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वनविभाग, कृषी विभाग अशा विविध यंत्रणांमार्फत मग्रारोहयो अंतर्गत कामे सुरू केली आहेत. त्यामध्ये सलग समपातळी चर खोदणे, दगडी बांध, घरकुल, वृक्षलागवड, सार्वजनिक विहिरी, गावतलावाचा गाळ काढणे, सिंचन विहिरी अशी विविध कामे उघडण्यात आल्याची माहिती चिखलदऱ्यात ७४४ कामे तहसीलदार माया माने यांनी ‘लोकमत’ला दिली. धारणी तालुक्यात ३०७ कामे सुरू असल्याचे तहसीलदार अतुल पडोळे यांनी सांगितले.
आठ दिवसांत हजारो हातांना काम
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यात मग्रारोहयो अंतर्गत विविध कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिल्यावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महसूल प्रशासनाला तसे आदेश दिले होते. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी याबाबत मागणी केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, चिखलदºयाच्या तहसीलदार माया माने, खंडविकास अधिकारी प्रकाश पोळ, धारणीचे तहसीलदार अतुल पडोळे, खंडविकास अधिकारी महेश पाटील यांनी आढावा घेतला. त्यानंतर ग्रामपंचायती अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दीपेंद्र कोराटे, लघुसिंचन विभागाचे ललित सोनोने, शिरीष तट्टे तसेच कृषी, वन विभाग आदी यंत्रणांमार्फत ही कामे सुरू आहे. काही विभागांनी नियोजन केले आहे.
ग्रामपंचायती अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्यात आली आहेत. जवळपास ७४४ कामांवर २५ हजार मजुरांना सद्यस्थितीत आठ दिवसांत कामे उपलब्ध करून दिली आहेत.
- प्रकाश पोळ,गटविकास अधिकारी, चिखलदरा
धारणी तालुक्यात ३०७ कामांवर १० हजार मजूर मग्रारोहयो अंतर्गत कार्यरत आहेत. इतर यंत्रणांमार्फत जास्तीत जास्त कामे उघडण्यात येत आहेत.
- अतुल पाटोळे
तहसीलदार, धारणी