राज्यातील अंगणवाड्यांचे काम मेपासून होणार पेपरलेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:10 AM2019-04-17T11:10:27+5:302019-04-17T11:11:38+5:30
पेपरलेस कामकाजाच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या राज्य शासनाच्या अंगणवाडी सेविकांना आता सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आॅनलाइन भरावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पेपरलेस कामकाजाच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या राज्य शासनाच्या अंगणवाडी सेविकांना आता सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आॅनलाइन भरावा लागणार आहे. त्यासाठी शासनाने मोबाइल संच उपलब्ध केले आहेत. मेपासून अंगणवाड्यांचे काम पेपरलेस होण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांची यासंदर्भात कार्यशाळा घेण्यात येत आहे. यानंतर अंगणवाडी सेविकांना एप्रिल महिन्याअखेरीस प्रशिक्षण दिले जाईल. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने विकसित केलेल्या मोबाइल अॅपद्वारे कामकाज करण्यात येणार आहे. याबाबत सर्व स्तरांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १ मेपासून अंगणवाड्यांतील कामकाज पेपरलेस करण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले असून, रजिस्टरऐवजी मोबाइल अॅपच्या माध्यमातून स्मार्ट फोनमध्येच लसीकरण व गृहभेटीच्या दैनंदिन नोंदी व बालकांच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जातील. जिल्ह्यात याचा वापर प्रभावीपणे करून जबाबदारीने काम करण्याचे निर्देश महिला व बाल कल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ यांनी दिले आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने सदर मोबाइल अॅप विकसित केले आहे.
पूरक पोषण आहार, औषधी वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे, गरोदर माता-बालकांचे वजन, लसीकरण यांसह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल अंगणवाडी सेविकांना केंद्र वा तालुका स्तरावर द्यावा लागत असतो. दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमरता लक्षात घेता, असे अहवाल वेळेत सादर करण्यासाठी मोठी कसरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागत होती. आता या माहितीचे तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत बघता येणार आहे.
अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांचे कामकाज गतिमान होण्यासाठी शासनाने मोबाइल देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना मोबाइल देण्यात आले आहेत. आता दैनंदिन कामकाज आॅनलाईन होणार आहे.
- प्रशांत थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, अमरावती.