नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:28+5:302021-09-02T04:27:28+5:30
अमरावती : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेले रस्ते, पूल, शाळा, रुग्णालये ...
अमरावती : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेले रस्ते, पूल, शाळा, रुग्णालये आदी बांधकामे तसेच नागरी सुविधांची बांधकामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. चांदूर बाजारच्या शासकीय विश्रागृहात अचलपूर व चांदूर बाजार सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चांदूर बाजारचे उपअभियंता एम.पी. भेंडे, अचलपूरचे उपअभियंता विजय वाट, कार्यकारी अभियंता मृणाल पिंजरकर यांच्यासह विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा गावांच्या विकासावर अवलंबून असतो. शहरात तसेच गावांमध्ये नागरी सुविधांची कामे नियोजनपूर्वक झाली, तर जनसामान्यांच्या अडचणी कमी होतात. स्वच्छ व सुंदर गावे ही जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात नावलौकीक मिळवून देतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारीत येत असलेली सर्व बांधकामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी. बांधकामासंदर्भात स्थानिकांकडून कोणत्याही तक्रारी येऊ नये, अशा पद्धतीची नियोजनबद्ध बांधकामे करण्यात यावीत. रस्ते, पूल, शाळा, रुग्णालये, शासकीय इमारतींचे बांधकाम हे नियोजनपूर्वक व सुरळीत आराखडा आखून करण्यात यावी. दोन्ही शहराच्या विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीही राज्यमंत्र्यांनी दिली.