गोंडवाघोली येथील चार बंधाऱ्यांचे काम निकृष्ट
By admin | Published: August 31, 2015 12:11 AM2015-08-31T00:11:37+5:302015-08-31T00:11:37+5:30
वागडोह ग्राम पंचायत अंतर्गत मौजा गोंडवाघोली या आदिवासी भागातील गायमुखाच्या एका नाल्यावर जे.सी.टी. महाशासनाच्या जलशिवार योजना अभियानांतर्गत ...
पथ्रोट : वागडोह ग्राम पंचायत अंतर्गत मौजा गोंडवाघोली या आदिवासी भागातील गायमुखाच्या एका नाल्यावर जे.सी.टी. महाशासनाच्या जलशिवार योजना अभियानांतर्गत चार सिमेंट बंधाऱ्यांचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार मुख्यमंत्री, कृषिमंत्री, म.रा. मंत्रालय मुंबई, पालकमंत्री प्रवीण पोटे, अमरावती, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त अमरावती विभाग यांचेकडे माजी सरपंच राघेलाल कारले व ग्रामस्थांनी केली.
तक्रारीमध्ये कामामध्ये अनियमितता रस्टोगेटप्रमाणे सिमेंट, लोखंड व नदीच्या रेतीऐवजी नाल्याची मातीमिश्रित रेतीचा वापर करण्यात आला. बांधकामावर योग्य क्युरींग करण्यात आले नाही. तसेच चारही बंधाऱ्याचे काम करीत असताना गोंडवाघोली येथील गरजू व गरीब मजुरांना कामावर लावण्यात आले नसून सदर बांधकाम मध्य प्रदेशातील मजूर ठेकेदाराकडून करवून घेतले. याबाबत कृषी सेविका यांना गावकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांनी ग्रामस्थांना उडवाउडवीचे उत्तर दिले. बांधकामात सिमेंटचा योग्य माल न वापरता मोठे दगड व पाण्यांनी घट्ट झालेले सिमेंटचे पोते वापरण्यात आले. तसेच इस्टेमेंट प्रमाणे लोेखंडी रॉडचे अंतर दूर दूर ठेवून कामे प्रमाणात लोखंडाचा वापर करण्यात आला.
सदर सिमेंट बंधारे पूर्ण झाल्यावर पावसाळा सुरु झाला व पावसाळ्यामध्ये पाणी पडल्यामुळे नाल्याला पूर आला. त्यामुळे बांधाऱ्यामध्ये टाकलेले दगड व सिमेंटचे पोते उघडे पडून त्यांच्या क्षेत्रामधून बांधलेल्या बांधाऱ्यातून पाणी निघून जाते. त्यामुळे बंधाऱ्यामध्ये पाणीच शिल्लक राहत नाही. याची विचारणा आम्ही कृषी सेविका अचलपूर यांच्याकडे केली असता तुम्हाला यातील काही समजत नाही. 'तुम्ही कामात अडथळा आणू नका, नाही तर तुमच्या नावाची संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करीन', अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या कामाच्या चौकशीची मागणी माजी सरपंच राधेलाल कराळे व ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)