प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘मिशन मोड’वर कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:10+5:302021-06-23T04:10:10+5:30

अमरावती : येथून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने विमानतळाची कामे पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या ...

Work on ‘Mission Mode’ to start the actual flight | प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘मिशन मोड’वर कामे करा

प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘मिशन मोड’वर कामे करा

Next

अमरावती : येथून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने विमानतळाची कामे पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशन मोडवर पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधी उपलब्धता व इतर बाबींसंदर्भात लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल व आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे दिली.

पालकमंत्र्यांनी मंगळवारी सकाळी बेलोरा विमानतळाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली व संपूर्ण विमानतळाची पाहणी केली. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे (एमएडीसी) मुख्य अभियंता एस.के. चटर्जी, रामेश्वर कुरजेकर, त्याचप्रमाणे राईटस् लिमिटेड या कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते.

सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आवश्यक निधीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला जाईल. याबाबत स्वतंत्र बैठक लवकरच होईल. एमएडीसीचे अधिकारीही उपस्थित असतील. आवश्यक तो सर्व निधी मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. एटीआर-७२ विमाने उतरण्याची सुविधा व नाईट लॅडिंगच्या सुविधेसाठी विस्तारीकरणाची कामे करण्यासाठी ‘एमएडीसी’कडून राईटस् लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. राईटस् लिमिटेड ही कंपनी केंद्र शासनाचा उपक्रम असून, ती आरेखन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करेल. या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या संरक्षण तसेच वने व पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली आहे.

---------------------

विमानतळाचे अद्ययावतीकरण होणार

बेलोरा विमानतळाचे अद्ययावतीकरणाच्या कामाची जबाबदारी शासनाने ‘एमएडीसी’कडे सोपविली आहे. त्यानुसार विमानतळावर एटीआर-७२ किंवा तत्सम प्रकारची विमाने येथे उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्यात येत आहे. येथे रात्रीच्यावेळी विमाने उतरण्याची सुविधाही निर्माण होणार आहे. या विमानतळाचा उडान (आरसीएस) या केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत उडान ३.० मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु करण्याचा मार्ग अलायन्स एअरलाईन्स यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यासाठी ‘मिशन मोड’वर कामे करणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

------------------

पाणी, वीज सुविधांसह वळण रस्त्याचे काम पूर्ण

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत विमानतळाला पाणीपुरवठा, महावितरणमार्फत अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या संरक्षणभिंतीची उभारणी प्रगतिपथावर आहे. नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात येत असून, त्याची निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. धावपट्टीची लांबी १३७२ वरून १८५० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. हे काम प्रगतिपथावर आहे. ही सर्व कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Web Title: Work on ‘Mission Mode’ to start the actual flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.