राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे काम कासवगतीने

By admin | Published: September 7, 2015 12:27 AM2015-09-07T00:27:30+5:302015-09-07T00:27:30+5:30

अप्पर वर्धा धरणाशेजारी असलेल्या राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या पुनरुज्जीवनाचे संथ गतीने सुरु असलेल्या ...

The work of the National Fish Seed Production Center | राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे काम कासवगतीने

राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे काम कासवगतीने

Next

जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी : कामाला गती देण्याचे निर्देश
मोर्शी : अप्पर वर्धा धरणाशेजारी असलेल्या राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या पुनरुज्जीवनाचे संथ गतीने सुरु असलेल्या कार्याबद्दल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी नाराजी व्यक्त करीत कामाला गती देण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
अप्पर वर्धा धरणाच्या निर्मितीनंतर धरणातून मासेमारी व्हावी, याशिवाय पश्चिम विदर्भातील लहान मोठ्या तलावातून मत्स्यउत्पादन व्हावे यासाठी लागणाऱ्या मत्स्यबीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याच्या उद्देशाने तत्कालीन शासनाने राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राची निर्मिती धरणाशेजारी असलेल्या नशिरपूर शिवारात केली होती. यासाठी ३३ हेक्टर जमीन अधिग्रहण करून त्यावर मत्स्यबीजाचे १०० संगोपन तळे आणि १० संचयन तळ्यांची निर्मिती करण्यात आली होती. निर्मितीपासून आजतागायत पूर्ण क्षमतेने या केंद्रातून उत्पादन सुरूच झाले नाही. दरम्यान, मत्स्य व्यवसाय विभागाच्या दुर्लक्षामुळे या महत्त्वपूर्ण केंद्राला अवकळा आली होती. लक्षावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या तळ्यांत मोठे वृक्ष उभे झाले आणि तळे निकामी झाले.
दरम्यान राज्य शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणानुसार, येथील राष्ट्रीय मत्स्यबीज केंद्रसुध्दा खासगी व्यक्तीकडे जाण्याची शक्यता पाहून जिल्हाधिकारी किरण गित्ते, आ. अनिल बोंडे यांनी येथील मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या पुनरुज्जीवनाकडे विशेषत्वे करुन लक्ष दिले. त्यांनी पुनरुज्जीवनाकरिता मत्स्यव्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर केला आणि शासनाकडून ३० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून घेतला. हा निधी संबंधित विभागाला जानेवारी २०१५ मध्येच दिला होता. मात्र कामाला गती आली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेस आले. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राला भेट देऊन पुनरुज्जीवनाच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक संचालक दीक्षित, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता भामरे, खुल्या कारागृहाचे अधीक्षक जगताप, येथील उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, नल दमयंती सागर मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव सुरजुसे उपस्थित होते.
मत्स्यबिज संगोपन तळ्यांमध्ये वाढलेल्या बाभळी व इतर वृक्ष काढून टाकण्यासाठी येथील खुल्या कारागृहातील बंदीजनांची मदत घेण्याचे, पर्यायाने त्यांना रोजगार प्राप्त करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. अप्पर वर्धा धरणात झिंग्याचे बीज सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी विशद केले.

Web Title: The work of the National Fish Seed Production Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.