पाळा ते भिवकुंडी रस्त्याचे काम तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:23+5:302021-07-26T04:11:23+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, ग्रामस्थांकडून स्वागत मोर्शी : अपघाताला आमंत्रण देणाऱ्या पाळा ते भीवकुंडी रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, यासंदर्भात तानाजी ...
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, ग्रामस्थांकडून स्वागत
मोर्शी : अपघाताला आमंत्रण देणाऱ्या पाळा ते भीवकुंडी रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, यासंदर्भात तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी चर्चा करून त्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्रीक्षेत्र पाळा ते भिवकुंडी या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून, या रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जागोजागी गिट्टी उघडी पडली आहे. हा भाग पूर्णतः आदिवासीबहुल आहे. आदिवासी बांधवांना दररोज मोर्शी शहरात यावे लागते. परंतु, हा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. भिवकुंडी येथे अंबादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रोडवर सातत्याने अपघात घडतात. बाराही महिने वर्दळीचा हा रस्ता नव्याने बांधकाम करण्यात यावा, यासाठी विविध संघटनांच्यावतीने शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परिणामी आंदोलनेसुद्धा उभारण्यात आली. मात्र, शासन प्रशासनाच्यावतीने या गंभीर समस्येकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तानाजी युवा बहुउद्देशीय संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी चर्चा करून या रोडच्या कामाची दखल घेऊन उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी तानाजी युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडागळे, उपाध्यक्ष जय ताटस्कर, दीप कुकडे, स्वप्निल वगरे, अजय वागदरे, मार्गदर्शक प्रवीण गवळी यांनी केली आहे.