बालमजुरांच्या हक्कासाठी संवेदनशीलतेने काम करा
By admin | Published: November 24, 2015 12:22 AM2015-11-24T00:22:45+5:302015-11-24T00:22:45+5:30
बालमजुरी प्रथा निर्मूलनासाठी सर्व संबंधित घटकांनी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असून शहरासह संपूर्ण जिल्हाभर या प्रथेविरुध्द प्रभावीपणे काम करण्याची गरज ...
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : बालदिन सप्ताहाचा समारोप
अमरावती : बालमजुरी प्रथा निर्मूलनासाठी सर्व संबंधित घटकांनी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असून शहरासह संपूर्ण जिल्हाभर या प्रथेविरुध्द प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत विशेष प्रशिक्षण केंद्र दसरा मैदान, अमरावती येथे आयोजित बालदिन सप्ताहाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात असून या प्रकल्पांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बालकामगार मुलांचे पुरर्वसन करण्यासाठी काम केले जाते. बालदिवसाचे औचित्य साधून बाल सप्ताहाचे आयोजन प्रकल्पा मार्फत करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून वसंतराव साउरकर, अध्यक्ष अमरावती जिल्हा बाल कल्याण समिती, प्रकल्प संचालक बी. जाधव, सरकारी कामगार अधिकारी, अंजली कुथे, सचिव जिल्हा बाल कल्याण समिती आदी उपस्थित होते. या प्रसंगी प्रकल्पांतर्गत सप्ताहाभर चाललेल्या उपक्रमाची तसेच प्रकल्पाची कामकाजाची प्रकल्प संचालक प्रवीण येवतीकर यांनी मान्यवरांना माहिती दिली. या दरम्यान परिसर स्वच्छता, केंद्र स्वच्छता, पालकसभा, चित्रकला स्पर्धा तसेच विविध खेळांच्या स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र चालविणाऱ्या अमरावती जिल्हा बालकल्याण समिती संस्थेचे अयध्क्ष वसंत साउरकर यांनी देखील प्रकल्पाच्या तसेच संस्थेच्या उपक्रमांविषयी अध्यक्षीय भाषणातून माहिती दिली.
याप्रसंगी बालकामगार प्रकल्पातील शिरीष देशमुख, प्रकाश गावफळे, संजय शहाकार, पंकज देशमुख, ललित ताथोडे, बबन हजारे उपस्थित होते. संचालन सुनीता देशमुख यांनी केले. तसेच अंजली कुथे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी इतर पाहुण्यांनी देखील समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठी उपस्थिती होती.