कडाक्याच्या थंडीत गेटसमोर कामगारांचा ठिय्या, चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 11:57 AM2022-01-05T11:57:31+5:302022-01-05T12:05:28+5:30
फिनले मिल सुरू व्हावी आणि थकीत वेतन कामगारांना मिळावे याकरिता सोमवार सकाळपासून मिलच्या चिमणीवर चढलेल्या कामगार नेत्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दरम्यान कामगारांनी चक्काजाम आंदोलन केले.
अमरावती : फिनले मिल चिमणी आंदोलनात तीनशे फूट उंचीच्या चिमणीवर तीन कामगार नेते सोमवारपासून चढले आहेत, तर शेकडो कामगार सोमवारी दिवसभर गेटसमोर ठिय्या मांडून होते. त्यांनी कडाक्याच्या थंडीत गेटसमोरच उघड्यावर सोमवारची रात्र काढली. सायंकाळपर्यंत महिला कामगारांचा या आंदोलनात सक्रिय सहभाग राहिला.
फिनले मिल सुरू व्हावी आणि थकीत वेतन कामगारांना मिळावे याकरिता सोमवार सकाळपासून मिलच्या चिमणीवर चढलेल्या कामगार नेत्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दरम्यान कामगारांनी चक्काजाम आंदोलन केले. परतवाडा अमरावती मार्गावर मिलच्या गेट समोर जवळपास अर्धा ते पाऊण तास कामगारांचे हे चक्काजाम आंदोलन सुरू होते. दरम्यान दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीनंतर कामगारांनी आपले हे चक्काजाम आंदोलन मागे घेतले. मात्र गेटवरील ठिय्या आंदोलन कायम ठेवले.
कामगारांना मुंबईचे आमंत्रण
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर मुंबई स्थित एनटीसीच्या दोन अधिकाऱ्यांनी पाच कामगारांना मुंबईला चर्चेकरिता बोलावले आहे. उलट कामगारांनी त्या दोन अधिकाऱ्यांनाच अचलपूरला येऊन कामगारांशी चर्चा करण्याचे निमंत्रण दिले. यादरम्यान मुंबईला पाच कामगारांचे शिष्टमंडळ चर्चेकरिता पाठवायचे की नाही, यावर गिरणी कामगार संघ विचार करीत आहे.
पत्रकारांना प्रवेश नाकारला
आंदोलनाच्या अनुषंगाने मंगळवारला सकाळी पत्रकारांनी मिलमध्ये जाऊन मिल व्यवस्थापकांकडून माहिती घेण्याच्या प्रयत्न केला. पण, पत्रकारांना गेटवरच रोखले गेले. त्यांना मिलमध्ये प्रवेश नाकारला गेला. मिल प्रबंधकांच्या या कृतीवर पत्रकारांनी गेटवरच आपला रोष व्यक्त केला.
अभय माथने याची प्रकृती गंभीर
कामगार नेते अभय माथने यांची चिमणीवरच तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान खाली उतरवून दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सोमवार सकाळपासून ते या चिमणीवर चढले होते. चिमणी आंदोलनाचे ते नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत चिमणीवर चढलेले ठाकूर आणि जामनेकर हे अद्याप ठाण मांडून आहेत.