मजुराचा मृत्यू, ठेकेदारावर कारवाई
By Admin | Published: November 15, 2016 12:09 AM2016-11-15T00:09:27+5:302016-11-15T00:09:27+5:30
सावर्डी एमआयडीसीतील एका प्रतिष्ठित कंपनीत बांधकाम करीत असताना मजुराचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला.
अमरावती : सावर्डी एमआयडीसीतील एका प्रतिष्ठित कंपनीत बांधकाम करीत असताना मजुराचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणात ठेकेदारावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी करून तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा नातेवाईकांनी सोमवारी सकाळी घेतला होता. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपाने ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांचा रोष शांत झाला.
वडरपुऱ्यातील रहिवासी गजानन महादेव मुंधळकर (२५) हे रविवारी सावर्डी एमआयडीसीतील एका कापड कंपनीत ठेकेदाराच्या बोलावण्यावरून कामकरिता गेले होते. बांंधकामस्थळी असणाऱ्या मिक्सर मशिनवर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाहाचा झटका बसला. इर्विन रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गजानन यांना मृत घोषित केले.
ठेकेदाराच्या अटकेची मागणी
अमरावती : घटनेची माहिती सायंकाळी मिळाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. नातेवाईकांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, अशी तक्रार नांदगाव पोलिसांना दिली. सोमवारी पोलीस प्रकाश पाल व गजानन परतेती यांच्या उपस्थितीत शव विच्छेदन होणार होते. मात्र, ठेकेदाराला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली. याबाबत पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी मृताच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांची समजूत घातली व ठेकेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.
मजुराच्या मृत्यू प्रकरणात ठेकेदारावर कारवाई करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांची होती. मात्र, ठेकेदारावर कायदेशिर कारवाई केल्यानंतर नातेवाईकांचा रोष शांत झाला.
-उमेश पाटील,
पोलीस निरीक्षक,
नांदगाव पेठ.