मजुरांची एसडीओ कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:45 PM2018-11-13T23:45:19+5:302018-11-13T23:45:34+5:30
हरिसाल येथील मजुरांना कामाचा मोबदला न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात सोमवारी उपविभागीय कार्यालयावर धडक देऊन वनपरिक्षेत्र अधिकाºयांची तक्रार करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : हरिसाल येथील मजुरांना कामाचा मोबदला न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात सोमवारी उपविभागीय कार्यालयावर धडक देऊन वनपरिक्षेत्र अधिकाºयांची तक्रार करण्यात आली.
मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्रात गणेश उत्सवादरम्यान जंगलातील कामे करण्याकरिता नरेगा योजनेतून वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांनी गावातील ६१ मजूर जंगल साफाईच्या कामावर लावले होते. त्या मजुरांची मजुरी कित्येक दिवसांपासून शासनाकडून मिळाली नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक नागले यांच्या नेतृत्वात हरिसाल वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात दीपाली चव्हाण यांना मजुरांचा मोबदला मिळावा, यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत १० दिवसांच्या आत मजुरांना कामाचा मोबदला देऊन दीपाली चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली. सोमवारी उपविभागीय अधिकारी हजर नसल्यामुळे नायब तसीलदार ए.टी.नाडेकर यांना निवेदन दिले. मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष दुर्गाताई बिसंदरे, युवक अध्यक्ष दीपक नागलेसह मजूर उपस्थित होते.वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आदिवासी मजुरांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकरिता मंगळवारी सायंकाळी मजुरांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.
शासनाकडून मजुराच्या मजुरीचे पैसे अद्याप प्राप्त झाले नसल्यामुळे मजुरांना पैसे मिळाले नाही. त्यासाठी प्रयत्न सुरूच आहे. पैसे प्राप्त होताच मजुरांच्या खात्यात जमा केले जातील. माझ्यावर लावलेले आरोप चुकीचे असून, मी कोणालाही शिवीगाळ व अभद्र भाषेचा वापर केला नाही.
- दीपाली चव्हाण, वनपरिक्षेत्राधिकारी, हरिसाल