रतन इंडियाच्या कामगारांचे बेमुदत उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 11:20 PM2017-11-05T23:20:07+5:302017-11-05T23:20:18+5:30
पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र असलेल्या नांदगावपेठ येथील रतन इंडिया पॉवर लि. कंपनीच्या कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांकरिता अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ नोव्हेंबरपासून ३० कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरपिंगळाई : पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र असलेल्या नांदगावपेठ येथील रतन इंडिया पॉवर लि. कंपनीच्या कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांकरिता अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ नोव्हेंबरपासून ३० कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पूर्वीच्या सोफिया व आताच्या रतन इंडिया कंपनीमध्ये मोठ्या स्थानिकांना रोजगार देण्यात आले. परंतु, हे मजूर ठेकेदारी पद्धतीने कामावर घेत असल्याने या मजुरांचे भविष्य अंधारमय आहे. त्यांना कधीही कामावरून कमी करणे, त्यांचा मानसिक छळ करणे तसेच त्यांच्या मजुरीच्या वेतनाबाबत अनियमितता असणे आदी प्रकाराने त्रस्त झालेल्या मजुरांनी हा सर्व प्रकार थांबवून कमी करण्यात आलेल्या सर्व मजुरांना कामावर घेण्याच्या मागणीकरिता आक्रमण कामगार युनियनचे अध्यक्ष सुनील गजभिये यांच्या नेतृत्वात १ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस असूनही त्यांची दखल न घेतल्याने असंतोष पसरला आहे.