जिल्हा परिषदेतील ‘त्या’ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी
By admin | Published: September 30, 2016 12:17 AM2016-09-30T00:17:51+5:302016-09-30T00:17:51+5:30
जिल्हा परिषदेच्या अख्त्यारितील विविध विभागांत मेळघाटात प्रतिनियुक्तीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी
प्रतिनियुक्तीचा वाद चिघळला : ३० सप्टेंबरची 'डेडलाईन'
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अख्त्यारितील विविध विभागांत मेळघाटात प्रतिनियुक्तीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी खातेप्रमुखांकडून ३० सप्टेंबरपर्यंत मागविली आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांची लवकरच उचलबांगडी होण्याची चिन्हे आहेत.
जि.प.च्या आस्थापनेवरील आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती मागील वर्षी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता मेळघाट सोडून वर्षानुवर्षे प्रतिनियुक्तीवर इतरत्र ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त रद्द करून त्यांना मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी परत पाठविले जाणार आहे. मेळघाट हा अनुसूचित क्षेत्राचा भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील कामकाज सुव्यवस्थित असणे आवश्यक आहे. शासनही मेळघाटातील अनेक कामांना प्राधान्य देते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि मेळघाटातील रखडलेली कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत. आधीच मेळघाटात अधिकारी, कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असल्याने कामात अडथळा निर्माण होतो. परिणामी मेळघाटसाठी दिलेली कामे विहित वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या अख्यारित येणाऱ्या आणि विविध ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्व नियुक्ती रद्द करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व खातेप्रमुखांना अशा कर्मचाऱ्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ३० सप्टेंबरची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. हा अहवाल प्राप्त होताच प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांची उचलबांगडी अटळ आहे. (प्रतिनिधी)