मराठी भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा दोन महिन्यांत - उपमुख्यमंत्री फडणवीस
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 10, 2023 06:01 PM2023-04-10T18:01:55+5:302023-04-10T18:03:03+5:30
१५ दिवसांमध्ये समिती स्थापन, उपलब्ध कक्षात कामकाज सुरू करणार
अमरावती : रिद्धपूर येथे स्थापना करण्यात येणाऱ्या मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी १५ दिवसांत समिती स्थापन करण्यात येईल. यामध्ये एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश करण्यात येईल. दोन महिन्यांत विद्यापीठाची कार्यकक्षा निश्चित होणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.
मराठी भाषा विद्यापीठ संदर्भात येथील नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये उच्च व तंत्र विभागाचे प्रधान सचिव विकासचंद रस्तोगी ऑनलाइन सहभागी झाले होते. रिद्धपूर येथे थीम पार्कमध्ये सभागृह, कक्ष उपलब्ध आहेत. तिथे तत्काळ विद्यापीठाचे आवश्यक ते काम सुरू करावे. या ठिकाणी अनेक अभ्यासक्रम मराठीत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी या विद्यापीठाचा उपयोग होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विद्यापीठाला स्वरूप कसे देता येता येईल, यासाठी ही समिती असेल. यासंदर्भातील फाईल लगेच पाठवित असल्याचे रस्तोगी म्हणाले. साधारणपणे १५ दिवसांमध्ये याबाबतचा शासन निर्णय निघेल. हे मराठी भाषा विद्यापीठ पब्लिक युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट फायनान्स या स्वरूपाचे राहणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी सोमवारी याबाबत नियोजन भवनात आढावा घेतला. बैठकीपश्चात त्यांनी रिद्धपूरला भेट दिली. त्यांनी श्री गोविंद प्रभू राजमठ येथे दर्शन घेतले. मठातर्फे मोहनराज बाबा कारंजेकर यांनी त्यांचे स्वागत केले.