५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:35+5:302021-06-09T04:15:35+5:30
जिल्हा परिषद : सीईओंच्या आदेशानुसार अंमलबजावणी सुरू अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मे महिन्यात कडक निर्बंध लागू ...
जिल्हा परिषद : सीईओंच्या आदेशानुसार अंमलबजावणी सुरू
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मे महिन्यात कडक निर्बंध लागू केले होते. अशातच ७ जूनपासून कोरोना संसर्ग कमी झाल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांल्या आदेशानुसार जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विविध कार्यालये सोमवारपासून ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झाले. यासंदर्भात आदेश ६ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला होता. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
मे महिन्यात जिल्हाभरात काेरोना विषाणूचा प्रादुर्भाव चांगलाचा वाढला होता. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. ही बाब लक्षात घेता कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाचा फटका बसू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑनलाइन कामाची मुभा देण्यात आली होती. यातून अत्यावश्यक सेवेतील आरोग्य व पाणीपुरवठा आणि पंचायत विभागाला वगळण्यात आले होते. अशातच मे अखेरीस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने कडक निर्बंधात टप्याटप्याने शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या सूचनेप्रमाणे कडक निर्बंधात शिथिलता देण्याचा आदेश जारी केला.
७ जूनपासून पुन्हा संचारबंदी नियमात शिथिलता देण्यात आल्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के करण्याचा आदेश सीईओंनी जारी केला होता. त्यानुसार विविध कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे.