एक कोटीपर्यंतची कामे जि. प. च्या अखत्यारित
By admin | Published: March 12, 2016 12:17 AM2016-03-12T00:17:27+5:302016-03-12T00:17:27+5:30
एक कोटी रुपयांपर्यंतची कामे आता जिल्हा परिषदेच्या अखत्यारित होणार आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत बांधकामे व दुरूस्तीच्या कामासाठी आता ..
विकास कामे प्रशस्त : बांधकाम विभागाचे अधिकार वाढवले
अमरावती : एक कोटी रुपयांपर्यंतची कामे आता जिल्हा परिषदेच्या अखत्यारित होणार आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत बांधकामे व दुरूस्तीच्या कामासाठी आता एक कोटीपर्यंतच्या कामांना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून तांत्रिक मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी शासनामार्फत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार वाढविण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत बांधकामे आणि विकास योजनांशी संबंधित २५ लाखांच्या कामांसाठी तांत्रिक मंजुरी देण्याचे अधिकार यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कामासंबंधी तांत्रिक मान्यता देण्याच्या कार्यकारी अभियंत्याच्या अधिकारात वाढ करण्याची मागणी विविध जिल्हा परिषदांकडून होत होती. त्यानुसार जि.प. व पं.स. अंतर्गत मुळ बांधकामे व दुरुस्ती कामासंबंधी तांत्रिक मान्यता देण्यासाठी कार्यकारी अभियंत्याच्या अधिकारात वाढ करून एक कोटीपर्यंतच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार देण्याबाबत ग्रामविकास विभागाने निर्देश काढले आहेत. (प्रतिनिधी)