राष्ट्रीय निवृत्ती योजनेवर गुरुवारपासून कार्यशाळा
By admin | Published: January 6, 2016 12:17 AM2016-01-06T00:17:58+5:302016-01-06T00:17:58+5:30
जानेवारी, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्यात केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.
शासनादेश : कर्मचाऱ्यांनाही देणार प्रशिक्षण
अमरावती : जानेवारी, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्यात केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना डीसीपीएस क्रमांक देण्यात आला आहे. प्रत्येक महिन्यात वेतन देयकातून कर्मचाऱ्यांचे स्वत:चे १० टक्के अंशदान कपात करून त्यांच्या खाती व त्याची नोंद घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रती महिना राज्य शासन सुद्धा कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस खात्यात जमा करते.
राज्य शासनाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे नामकरण (डीसीपीएस) चे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस) असे करण्यात आले आहे. या संदर्भात केंद्र शासनाने स्थापित केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना विश्वस्त मंडळ (एनपीएस ट्रस्ट) यांच्याबरोबर तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (सीआरए) म्हणून मे.एन.एस.डी.एल. इंन्फ्रास्ट्रक्चर यांच्याशी १० नोव्हेंबर २०१४ रोजी शासनाने करार केला आहे.
त्यानुसार आता सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अंशदान केंद्र शासनाने ठरवुन दिलेल्या विश्वस्त बँकेकडे पाठविण्यात येत आहे. तथापी या योजनेविषयी अधिकारी व कर्मचारी यांना पुरेशी माहिती नसल्याने सभ्रम निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे आपली किती रक्कम कपात झाली व शासनाचे किती अंशदान प्राप्त झाले या विषयी बऱ्याच कर्मचाऱ्यांना माहिती नाही. याबाबत जमा रक्कमेचे विवरणपत्र वर्षनिहाय जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती यांनी सर्व शासकीय कार्यालयांना उपलब्ध करुन दिले आहे. मात्र बऱ्याच कार्यालयांनी ते कर्मचाऱ्यांना दिलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी कोषागार कार्यालयामध्ये प्राप्त होत आहे.
या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने ७ ते १६ जानेवारीपर्यंत प्रशासकीय विभागनिहाय कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यालयातील वेतन देयक बनविणारा एक कर्मचारी व आस्थापनाविषयक कामकाज करणारा एक कर्मचारी यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे काही कर्मचाऱ्यांच्या विवरणपत्रात मिसिंग रक्कम असल्यास त्या दुरुस्त करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ते सर्व दस्तावेज घेऊन उपस्थित रहावे. ही कार्यशाळा सहसंचालक, लेखा व कोषागार, अमरावती यांच्या विद्यापिठ रोडवरील कार्यालयात होणार आहे.