जागतिक शाैचालय दिन; खर्च कोट्यवधी रुपयांचा; उपयोग अडगळ ठेवण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 12:40 PM2020-11-19T12:40:59+5:302020-11-19T12:41:46+5:30
Toilet Day Amravati News मेळघाटातील ग्रामपंचायती अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाची दैनावस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने वेळेपूर्वीच नामशेष होत असून, नागरिक त्याचा उपयोग अडगळीचे सामान ठेवण्यासाठी करीत असल्याचे चित्र आहे.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. घर तेथे शौचालय निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाच्यावतीने केला जात असताना मेळघाटातील ग्रामपंचायती अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाची दैनावस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने वेळेपूर्वीच नामशेष होत असून, नागरिक त्याचा उपयोग अडगळीचे सामान ठेवण्यासाठी करीत असल्याचे संतापजनक चित्र आहे. जागतिक शौचालय दिनी ही बाब लक्षवेधी ठरावी.
देशभरातील खेड्यांपासून शहरापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी सरपंच ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच रस्त्यावर उतरून जनजागृती केली. दुसरीकडे ग्रामीण भागात महिलांना उघड्यावर शौचालयासाठी जावे लागत असल्याचे गंभीर चित्र आहे. गावागावांत स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने होत असताना, मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांमध्ये मात्र ग्रामपंचायती अंतर्गत शौचालय बांधकामाचे तीनतेरा वाजले आहेत. तालुक्यातील खडीमल ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम झालेले शौचालय अर्धवट पडून असल्याचे चित्र आहे. त्यावरील लाखो रुपयांचा खर्च मात्र पूर्ण दाखविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
संबंधित सचिवांनी बांधकामात संगनमताने मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या विविध कामांची सखोल व मुद्देसूद चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.