२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जंतनाशक गोळ्या दिल्या का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:16 AM2021-09-14T04:16:05+5:302021-09-14T04:16:05+5:30
अमरावती : पोटात जंत झाले की, भूक मंदावणे तसेच वजन कमी होण्यासारख्या समस्यांबरोबरच फुफ्फुसाचे आजारही होऊ शकतात. त्यामुळेच ग्रामीण ...
अमरावती : पोटात जंत झाले की, भूक मंदावणे तसेच वजन कमी होण्यासारख्या समस्यांबरोबरच फुफ्फुसाचे आजारही होऊ शकतात. त्यामुळेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांना गोळ्या देऊन जंत होऊ नयेत, याबाबत दक्षता घेतली जाते. मात्र, गत वर्षभरापासून शाळाच बंद असल्याने या गोळ्यांचे वाटप पूर्णपणे ठप्प झाले आहे.
पूर्वी लहान मुलांच्या पोटात जंत होऊ नये, यासाठी घरगुती औषधे दिली जात. आता प्रभावी औषधे निघाली असली तरीही पुरेशी माहिती नसल्याने ती मुलांना दिली जात नाहीत. जंत आतड्यांमध्ये राहतात. पोटात दुखणे, मळमळणे यांसारख्या त्रास त्यामुळे होऊ शकतो. कृमिदोषामुळे ५ ते १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींना रक्ताक्षय, कुपोषणासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. यामुळे मुलांमध्ये कमजोरी तर येतेच, शिवाय शारीरिक वाढही खुंटते. गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. कृमिदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात. ती अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. म्हणूनच १ ते १९ वयोगटातील मुलाला जंतनाशक गोळी वर्षातून किमान एक दिलीच पाहिजे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बॉक्स
काय आहे जंतदोष ?
मोठे जंत (गोल जंत), लहान जंत (कृमी) हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. अशी मुले अशक्त असतात. ही मुले लवकर दमतात. त्यांच्या शरीराची वाढ खुंटू शकते. मूल अशक्त असेल, पोट मोठे असेल, शरीराची वाढ योग्य तऱ्हेने होत नसेल, तर जंत झाल्याचे ओळखावे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे गरजेचे असते.
बॉक्स
वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
१ ते १९ वर्षे वयाच्या मुलांना जंताचा त्रास जास्त होऊ शकतो. आतड्यांमधल्या जंताचे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठीच वर्षाला जंतनाशक गोळ्यांचे मुलांना वाटप केले जाते. एकदा का जंतांनी शरीरात प्रवेश केला की, ते आतड्यातील थर नष्ट करतात. त्यामुळे शरीरात अन्नघटकांचे शोषण नीट होत नाही.
बॉक्स
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातही जंतनाशक गोळ्या उपलब्ध होत आहेत. या ठिकाणी नागरिक जाऊन गोळ्या घेऊ शकतात तसेच आरोग्य सेविका, आशा, गटप्रवर्तक यांच्याशी संपर्क साधला तरीही त्या जंतनाशक गोळ्यांची उपलब्धता करून देऊ शकतात.
कोट
दीड वर्षात कोरोनामुळे शाळा भरल्या नाहीत. यामुळे जंतनाशक गोळ्यांचे मुलांना वाटप झाले नाही. पण, यावर्षी सध्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी येत्या काही दिवसांत आशा सेविकांमार्फत घरोघरी जंतनाशक गोळ्यांचे वाटप सुरू केले जाईल.
डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी
बॉक्स
आरोग्य विभागातर्फे केले जाते. वापट
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे विशेषत: अंगणवाडी ते दहावीपर्यंतच्या मुलांना शाळेतच जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते.