रुक्मिणीमातेच्या पादुकांची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:50+5:302021-06-16T04:17:50+5:30
तिवसा : श्री संत सद्गुरू सदाराम महाराज यांनी सन १५९४ साली सुरू केलेल्या व ४२७ वर्षांची परंपरा ...
तिवसा : श्री संत सद्गुरू सदाराम महाराज यांनी सन १५९४ साली सुरू केलेल्या व ४२७ वर्षांची परंपरा लाभलेल्या काैंडण्यपूर येथील विदर्भ राजकन्या रुक्मिणीमातेच्या पालखीची १४ जून रोजी मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली.
श्री रुक्मिणीमातेच्या पादुकांना संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर व सचिव सदानंद साधू यांनी सपत्नीक अभिषेक केला. पौरोहित्य हभप महल्ले महाराज यांनी केले. त्यानंतर भजन व आरती झाली. पादुका चालत आलेल्या परंपरेनुसार पालखीत घालून मंदिराला प्रदक्षिणा घालून श्री संत सदगुरू सदाराम महाराज यांच्या समाधीजवळ ठेवण्यात आली. नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, सचिव सदानंद साधु, उपाध्यक्ष वसंत डाहे, विश्वस्त अतुल ठाकरे, सुरेश चव्हाण, अशोक पंवार, विजय डहाके, हिंमत टाकोने, काळे व अन्य वारकरी हजर होते.