बिझिलँडमधील आराधना शोरूमला पाच हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:12 AM2021-04-25T04:12:52+5:302021-04-25T04:12:52+5:30
नांदगाव पेठ : जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसायांवर निर्बंध आणले असताना बिझिलँड ...
नांदगाव पेठ : जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसायांवर निर्बंध आणले असताना बिझिलँड मार्केटमधील बहुतांश दुकाने आतून सुरू असल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. आराधना या कापड शोरूममध्ये सकाळी ११ वाजताच्या सुमारास ग्राहक कापड खरेदी करीत असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये यांचेसह महसूल विभागाचा ताफा तेथे पोहचला. कारवाईअंती आराधना शोरूमच्या संचालकांना पाच हजारांचा दंड ठोठावला.
केवळ कारखाने सुरू ठेवण्याची परवानगी असताना बिझिलँडमध्ये काही दुकाने लपून छपून सुरू आहेत. पोलीस, महसूल, कृषी कर्मचारी याठिकाणी तैनात केले. मात्र, तरीही डोळ्यात धूळ फेकून येथील व्यावसायिक प्रशासनाला सहकार्य न करता व्यवसाय करीत आहेत. बाहेर गावाहून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येत असून कोरोना काळात ही धोक्याची घंटा समजली जात आहे. शुक्रवारी सकाळी येथील आराधना शोरूममध्ये बाहेरगावाहून आलेले ग्राहक कपडे खरेदीसाठी गेल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य बलविर चव्हाण यांनी ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये यांना दिली. माहितीच्या आधारे जयश्री गजभिये, मंडळ अधिकारी विशाल धोटे, तलाठी अर्जुन अलोकार, तलाठी दुधे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल बोडखे, कोतवाल गजानन खंडारे तातडीने आराधना प्रतिष्ठानजवळ पोहचले दुकानातून ग्राहक निघताना दिसले. त्याचक्षणी गजभिये यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आराधनाचे संचालक मुकेश जगमलानी यांना पाच हजारांचा दंड ठोठावून प्रतिष्ठान बंद करण्यास सांगितले.
खंडणीची खोटी तक्रार
दुसरीकडे संतापलेल्या मुकेश जगमलानी व बिजिलँड व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय भुतडा यांनी ग्रामपंचायत सदस्य बलविर चव्हाण यांच्यावर रोष व्यक्त करीत त्यांना बिजिलँड परिसरात शिवीगाळ करून नांदगांव पेठ पोलिसांत पाच हजार रुपयांची खंडणी मागत असल्याची खोटी तक्रार दाखल केली. एकीकडे कोरोना महामारी सुरू असताना शासनाच्या नियमांचे पालन न करता प्रतिष्ठाने उघडी ठेवून व्यवसाय सुरू आहे व दुसरीकडे खंडणी मगितल्याचा खोटा आरोप करून व्यावसायिक शासनाची दिशाभूल करीत आहेत.
बॉक्स
बलवीर चव्हाणविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल
आराधना प्रतिष्ठानचे संचालक मुकेश जगमलानी यांच्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्य बलवीर चव्हाण यांच्यावर पाच हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर करीत आहेत.