वऱ्हा येथे जगावेगळी तारामायदेवीची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:05 PM2018-09-11T22:05:39+5:302018-09-11T22:07:12+5:30
तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावी शेकडो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध प्रथमा अर्थात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तारामायदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे. जुन्या काळातील परंपरा लयाला जाऊन या आयोजनामागील उद्देश आता सामाजिक बांधीलकी व गावाची एकजूट असा उदात्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावी शेकडो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध प्रथमा अर्थात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तारामायदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे. जुन्या काळातील परंपरा लयाला जाऊन या आयोजनामागील उद्देश आता सामाजिक बांधीलकी व गावाची एकजूट असा उदात्त झाला आहे.
देवीपूजनाच्या अनुषंगाने परंपरेनुसार पूजेच्या पाच दिवस आधीपासून याची लगबग सुरू होते. काही कार्यकर्त्यांनी निधी गोळा केला. तर काहींनी शेतीसाठी लागणारी अवजारे सुताराकडून तयार करून घेतली. काहींनी कुंभारकडून मातीची खेळणी पूजेसोबत मांडायला तयार करून घेतली. या सर्वाची यावेळी पूजा केली जाते. मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावातून बेरड अर्थात पूजेत वापरण्यासाठी धान्य गोळा केले. पूजेचे दिवशी दुपारी १२ पासून जवळपास दोन क्विंटल शिरा तयार करण्यात आला. प्रसाद तयार होताच गावातील सर्व सीमापूजनाचा कार्यक्रम सुरू झाला. १०-१२ लोकांचा एक अशाप्रकारे पाच गट करून गावसीमेवर जाऊन पूजा करण्यात आलीे. सीमापूजनाचे कार्यकर्ते परत आल्यानंतर मंदिरात देवीपूजेला सुरुवात झाली.
श्री हनुमान मंदिर संस्थानात आरती करून वेगळ्याच प्रकारच्या वाट्यांमध्ये मंदिरापासून या देवीपूजा आरतीची व मिरवणुकीची सुरुवात झाली. प्रत्येकाकडे सोपविलेली जबाबदारी ते पूजेचे साहित्य, की देवीची खेळणी, सर्वानी उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला.
सीमापुजला जाणाऱ्या भाविंकाना त्रास होवू नये यासाठी हातात खराटा हातात घेण्याचे व बेरड वाटप करून धूमधडाक्यात आणि तेवढ्याच उत्साहाने करतात. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तारामाय मंदिरात उदो-उदोचा गजर करीत पोहोचल्यानंतर. येथे पुजा करून सर्व जण गावाकडे पोहोचले. जोपर्यंत लोक परत येत नाही, तोपर्यंत हनुमान मंदिरात अखंड कापूरज्योत हनुमान मंदिरात अखंड कापूरज्योत सुरू असते.
हे आहे पूजेचे वेगळेपण
तारामायदेवीच्या पूजेत वखर, डवरे आदी शेती साहित्यासह स्वावलंबतेचा धडा देणारा चरखा, स्वयंपाकासाठी वापरली जाणारी, परंतु खेळण्यासाठी तयार केलेली मातीची भांडी याचीदेखील यावेळी पूजा केली जाते. यासाठी गावातील सर्व धर्माचे नागरिक स्वयंस्फूर्तपणे सहकार्य करतात.
सर्व जाती-धर्मातल्या नागरिकांचा सहभाग असलेला, परंतु यामधून स्वंयपूणतेची शिकवण देणारा हा उत्सव आहे. यानंतर धार्मिक सप्ताहाला सुरूवात होते.
- पंडितराव मालधुरे, सचिव, मारोती महाराज संस्थान.