चिटफंड घोटाळा १.८० कोटींवर! आरोपी मिलन पोपट पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 05:33 PM2022-02-08T17:33:56+5:302022-02-08T17:52:33+5:30
अमरावतीतील घोटाळ्याची एकूण रक्कम १ कोटी ८० लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तपास यंत्रणा असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याच्या या व्याप्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.
अमरावती : चिटफंड कंपनी उघडून येथील गुंतवणूकदारांना कोट्यवधींनी लुबाडणाऱ्या मिलन पोपट या सूत्रधाराला अटक करण्यासाठी पोलीस गुजरातेतील बडोदा येथे गेले खरे, मात्र तेथूनही तो पसार झाल्याने पोलिसांना रिक्तहस्ते परतावे लागले. दरम्यान, या प्रकरणातील घोटाळ्याची एकूण रक्कम १ कोटी ८० लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तपास यंत्रणा असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याच्या या व्याप्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.
रुख्मिणीनगरमध्ये चिटफंड कंपनी उघडून येथील मिलन पोपट व एका महिलेने गुंतवणूकदारांची तब्बल ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार २२ जानेवारी रोजी राजापेठ पोलिसांनी नोंदवून घेतली होती. त्या तक्रारीवरून मिलन हिंमतलाल पोपट (३५, फ्लॅट नं. १०४, श्रीनिवास अपार्टमेंट, पुनम इलेक्ट्राॅनिक्सजवळ, अंबिकानगर, अमरावती) व एक महिला अशा दोघांविरुद्ध विविध कलमांसह चिटफंड ॲक्टचे कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल केला.
प्रकरण आर्थिक स्वरूपाचे असल्याने २३ जानेवारी रोजी त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्या शाखेने मिलन पोपटचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले असता, ते गुजरातला मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेंडे हे गुजरातमधील बडोदा शहरापर्यंत जाऊन आले. मात्र, शातीर असलेला मिलन पोपट वारंवार लोकेशन बदलत असल्याने व मोबाईल स्विच्ड ऑफ ठेवत असल्याने पोलिसांना त्याचा मागमूस लागू शकला नाही.
...अशी होती गुंतवणूक
मिलन पोपट व एका महिलेने रुक्मिणीनगरस्थित एका मंगल कार्यालयाच्या बाजूने स्वत:चे चिटफंड कार्यालय उघडले. तेथे शहरातील ४५० जणांकडून १ हजार रुपये प्रति महिना अशी रक्कम पाच वर्षांसाठी स्वीकारली गेली. त्या योजनेला ३ वर्ष ९ महिने पूर्ण झाल्यानंतर पोपटचे बिंग फुटले. तक्रारी सुरू झाल्या. चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोपट याने या कालावधीत गुंतवणूकदारांना ४५ बक्षिसेदेखील दिली. लकी ड्रॉमध्ये नंबर न लागल्यास ६० महिन्याचे ६० हजार रुपये परतावा देण्याची हमी त्याने दिली होती.
चिटफंड कंपनी उघडून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुंतवणूकदारांची बयाने नोंदविली जात आहेत. सूत्रधाराच्या शोधासाठी ‘टीम इओडब्ल्यू’ गुजरातला जाऊन आली.
शिवाजी बचाटे, प्रमुख, आर्थिक गुन्हे शाखा