छत्रसाल नगरातून ५.८५ लाखांचा ऐवज लांबविला
By प्रदीप भाकरे | Published: June 23, 2023 02:47 PM2023-06-23T14:47:54+5:302023-06-23T14:48:17+5:30
अज्ञात आरोपीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रसाल नगर येथील एका महिलेच्या घरातून ४ लाख ५ हजार रुपये रोख व ६५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण ५ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. १९ ते २२ जूनदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी २२ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास अज्ञात आरोपीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
छत्रसालनगरात राहणारी ती महिला कुटुंबियांसमवेत मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे गेली होती. २२ जून रोजी सकाळी त्यांच्या शेजाऱ्याने तुमच्या घराचे कुलूप तुटले आहे, अशी माहिती त्यांना फोनकॉलद्वारे दिली. त्यामुळे त्या सायंकाळी पाचच्या सुमारास घरी पोहोचल्या. घरात जाताच तिजोरीचे दार उघडे दिसले. त्या तिजोरीतील अन्य व्यक्तीने ठेवलेले ३.५० लाख रुपये, फिर्यादी महिलेचे ५५ हजार रुपये व सोन्याचे दोन हार व कानातले जोड दिसून आले नाही. तर दुसऱ्या बेडरूममधील आलमारी देखील चोरट्यांनी साफ केली. त्यातून महिलेच्या सुनेचा १५ ग्रॅमचा हार व पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी चोरीला गेली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगरच्या एसीपी पुनम पाटील, ठाणेदार आसाराम चोरमले यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक व ठसेतज्ञाला पाचारण करण्यात आले