परतवाडा आगाराची भंगार बस मेळघाटात नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:10+5:302021-09-27T04:14:10+5:30
फोटो - बस २५ पी फोटो कॅप्शन - डोमानजीक नादुरुस्त बसगाडी आणि प्रवासी परतवाडा : जुन्या आणि भंगार झालेल्या ...
फोटो - बस २५ पी
फोटो कॅप्शन - डोमानजीक नादुरुस्त बसगाडी आणि प्रवासी
परतवाडा : जुन्या आणि भंगार झालेल्या परतवाडा आगारातील बसगाड्या प्रवाशांसाठी तापदायक ठरत आहेत. त्याचा अनुभव पुन्हा रविवारी सकाळी भुत्रुम-परतवाडा बसफेरीला आला. नादुरुस्त बसमुळे महत्त्वपूर्ण कामासाठी निघालेले आदिवासी प्रवासी जंगलातच अडकले.
परतवाडा आगाराची एमएच ०७ सी ९४६९ क्रमांकाची हतरू-भुत्रुम बसफेरी रात्री मुक्कामी होती. रविवारी १० वाजता ४० पेक्षा अधिक प्रवासी घेऊन ती परत निघाली. डोमा गावानजीक ही बस नादुरुस्त झाली. परतवाडा ते भुत्रूम हे अंतर १२० किमी आहे. ही एकच बसफेरी असल्यामुळे अतिदुर्गम चिलाटी, कुही, डोमी, कारंजखेडा, चुरणी, जारीदा, अशा गावांतील आदिवासींना महत्त्वपूर्ण आहे. मेळघाटात नादुरुस्त आणि भंगार बसगाड्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आधीच बोटावर मोजण्याएवढ्या बसफेऱ्या कोरोनापश्चात मेळघाटात सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातही भंगार आणि नादुरुस्त बसगाड्या पाठवणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल भक्ते यांनी केली आहे.
---------------मध्यरात्रीपासून जागतात आदिवासी
चिखलदरा, धारणी, परतवाडा, अमरावती या जिल्हा व तालुका मुख्यालयी महत्त्वपूर्ण कामांसाठी ये-जा करण्यासाठी आदिवासींना मध्यरात्रीपासूनच जागे राहावे लागते. पहाटे उठून काही अंतर पायी चालून बस पकडावी लागते. त्यावरही कळस म्हणजे नादुरुस्त आणि भंगार बसगाड्या रस्त्यातच उभ्या राहत असल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
--------------उपाशी प्रवासी, अर्ध्यावरच अडकले
भुत्रुम येथून पहाटे ७ वाजता निघालेली बस दहा वाजता डोमा गावानजीक नादुरुस्त झाली. दुपारी १ वाजेपर्यंत दुसरी कुठलीच बस किंवा खाजगी वाहन न मिळाल्याने आदिवासींना ताटकळत बसले. अर्ध्यावर थांबलेल्या या प्रवाशांना वाहकाने तिकिटाचे पैसेसुद्धा परत केल्याची माहिती आहे. काहींनी येथूनच गावी परतण्याचा निर्णय घेतला.
कोट
अतिदुर्गम हतरू परिसरात एकच बसफेरी सुरू आहे. भंगार आणि नादुरुस्त बसफेरी यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. महामंडळाच्या या गलथान कारभाराला आळा घालावा.
- स्वप्निल भक्ते, प्रवासी, चुरणी