परतवाड्यात मोर्शीच्या शिक्षिकेवर चुकीचा उपचार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:12 AM2021-05-26T04:12:59+5:302021-05-26T04:12:59+5:30
परतवाडा : डॉक्टरचा हलगर्जीपणा व चुकीच्या औषधोपचारामुळे आदर्श शिक्षिका असलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची फिर्याद तिच्या पतीने परतवाडा पोलिसांसह ...
परतवाडा : डॉक्टरचा हलगर्जीपणा व चुकीच्या औषधोपचारामुळे आदर्श शिक्षिका असलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची फिर्याद तिच्या पतीने परतवाडा पोलिसांसह जिल्हाधिकारी, आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. संबंधित डॉक्टरविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी केली आहे
रवींद्र उत्तमराव टिपरे (रा. सौरभ कॉलनी, सिंभोरा रोड, मोर्शी) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ४ एप्रिल रोजी परतवाडा येथे त्यांचे संपूर्ण कुटुंब डॉ. वैभव पाटील यांच्या दवाखान्यात कोरोना आजारावर उपचार घेत होते. ६ एप्रिल रोजी पत्नी प्रतिभा यांचे डोके दुखायला लागले. ७ एप्रिलला चेहऱ्याचा एक भाग व डोळा सुजला. त्याकडे डॉक्टरांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याची तक्रार रवींद्र टिपरे यांनी केली.
बॉक्स
चुकीच्या औषधोपचारामुळे घेतली सुटी
डॉक्टर अधिक क्षमतेच्या गोळ्या देत असल्याने प्रकृती खालावली. अखेर विनंती करून १० एप्रिल रोजी आजारी पत्नीच्या पुढील उपचारासाठी येथून सुटी घेतली. तिला अमरावती येथे हलविले. तेथे म्युकरमायकोसिस या फंगल इन्फेक्शनचे निदान झाल्याचे रवींद्र टिपरे म्हणाले.
बॉक्स
नागपूरला उपचारादरम्यान मृत्यू
गंभीर आजारी असलेल्या प्रतिभा टिपरे यांना ११ एप्रिल रोजी नागपूर येथील रामदास पेठेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १५ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता पत्नीचा मृत्यू झाला. प्रारंभी डॉ. वैभव पाटील यांनी वेळ दवडला. आजार बळावल्याने पत्नीचा मृत्यू झाला. यामुळे संबंधितांविरुद्ध चौकशी करून कारवाईची मागणी रवींद्र टिपरे यांनी केली आहे.
कोट
संबंधित डॉक्टरांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे. वैद्यकीय नियमानुसार सदर प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. चौकशीअंती कारवाई करण्यात येईल.
सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा