दहावी, बारावीचे फेरतपासणीचे अर्ज ऑनलाईन; विद्यार्थ्यांना विभागीय शिक्षण मंडळात येण्याची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 06:51 PM2020-07-01T18:51:19+5:302020-07-01T18:51:27+5:30
जुलै महिन्यात दहावी, बारावीचे निकाल जाहीर करण्याची तयारी शिक्षण मंडळाने चालविली आहे.
अमरावती : इयत्ता दहावी, बारावीचे निकाल तूर्तास जाहीर व्हायचे आहे. मात्र, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्या विषयासाठी फेरतपासणीचा अर्ज करायचा असल्यास आता तो ऑनलाईन भरावा लागणार आहे. त्याकरिता राज्य शिक्षण मंडळाकडून नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
जुलै महिन्यात दहावी, बारावीचे निकाल जाहीर करण्याची तयारी शिक्षण मंडळाने चालविली आहे. यंदा दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आला. भूगोल विषयांचे गुण देण्याबाबतचे निकष ठरविण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षा वेळीच आटोपल्यामुळे अगोदर इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती बोर्डातून मिळाली आहे. परंतु, निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थी एकच गर्दी करतात. कोरोनामुळे ही गर्दी धोकादायक ठरू शकते.
परिणामी विद्यार्थ्यांना फेरतपासणीसाठी अर्ज करायचा असल्यास त्यांना पीडीएफ स्वरूपात अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे. 'ऑनलाईन मूल्यांकन अॅप्लिकेशन' असे त्याचे नाव असेल. मुंबई, कोकण, लातूर, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना फेरतपासणीसाठी अर्ज, शुल्क भरणे, अर्ज स्कॅनिंग आदी प्रक्रिया ऑनलाईन करावी लागणार आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना बोर्डात येण्याची आवश्यकता राहणार नाही, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
पेपरची फेरतपासणी होणार ऑफलाईन
इयता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी संबंधित विषयांच्या फेरतपासणीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या विषयांच्या शिक्षकांकडून पेपरची ऑफलाईन फेरतपासणी करण्यात येणार आहे. विभागीय शिक्षण मंडळात संबंधित विषय शिक्षकांना बोलावून त्या विषयाचे पेपर तपासणी करण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित करण्यात येतील. बोर्डात विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, ही काळजी घेण्यात येत आहे.
कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना फेरतपासणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. शुल्कदेखील आॅनलाईन भरावे लागतील. ऑनलाईन प्रणालीसाठी नवे सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे. - जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती.